वार्ताहर /नंदगड
खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात पाणी भरले आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाल्याने या रस्त्यावरुन जाणारी वाहने खड्डय़ात रुतण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
खानापूरहून गोव्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हेम्माडगा-अनमोड-पणजी रस्ता सोयीचा आहे. दिवसा या रस्त्यावरुन वाहतूक मोठय़ा प्रमाणात असते. या रस्त्यादरम्यान भीमगड अभयारण्य येत असल्याने जंगली पशुप्राण्यांना धोका पोहचू नये म्हणून सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्रभर या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येते.
या रस्त्यावरील वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेले पंधरा दिवस पाऊस झाल्याने रस्त्यावरील खड्डय़ातून पाणी साचून मोठय़ा प्रमाणात चिखल झाला आहे. या चिखलात वाहने अडकून पडत आहेत. बुधवारी ठिकठिकाणच्या खड्डय़ात अनेक वाहने अडकल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.
खानापूर तालुक्यातील हेम्माडगा, डोंगरगाव, मणतुर्गा, नेरसा परिसरातील 20 हून अधिक लहान मोठय़ा गावातील लोक याच रस्त्यावरुन तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामे, बाजार, दवाखाना व अन्य कामासाठी येतात. त्यामुळे त्यांची वाहनेही अडकून त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे.