नोव्हेंबरमध्ये 7.77 वरून 8.0 टक्क्यांपर्यंत वाढ : तीन महिन्यांतील सर्वोच्च दराची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात बेरोजगारीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्?ये बेरोजगारीचा दर 8.0 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा दर गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.77 टक्के होता.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) गुरुवारी बेरोजगारी दराची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, शहरी बेरोजगारीचा दर नोव्हेंबरमध्ये 8.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या महिन्यात तो 7.21 टक्के होता. तर, ग्रामीण बेरोजगारीचा दर 8.04 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमधील बेरोजगारीचा दर नोव्हेंबर महिन्यात 0.1 टक्क्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचला आहे. देशभरातील हा सर्वात कमी बेरोजगारीचा दर आहे. या महिन्यात सर्वाधिक बेरोजगारी हरियाणामध्ये नोंद झाली असून राज्यात हा दर 30.6 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर राजस्थानमध्ये 24.8 टक्के इतका बेरोजगारी दर नोव्हेंबर महिन्यात नोंदवला गेला आहे.