भिलवडी / वार्ताहर
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच कोयना धरण ८० टीएमसी पेक्षा जास्त भरले आहे. कोयना धरणातून आज पासून पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. नदीला आलेल्या पूरामुळे पलुस तालुक्यातील नागठाणे बंधारा बुधवारी पाण्याखाली गेला, तर औदुंबर येथील श्री दत्त मंदीर परिसरातही गुरूवार दुपारी पाणी शिरले आहे. या बंधाराठिकाणी जाण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना बंदी केली आहे. तर औदुंबर येथील श्री दत्त मंदीर अजून ही भक्तांसाठी खुले आहे. साधारण अजून ३ फुट पाणी पातळी वाढली तर मंदीर दर्शनासाठी बंद करण्यात येईल.