Tarun Bharat

मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत वाढ

Advertisements

तालुक्याच्या पश्चिम भागात अधिक पाऊस : अतिवृष्टी झाल्यास पिकांचे मोठे नुकसान

वार्ताहर /किणये

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे किणये-संतिबस्तवाड भागातील मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी सध्या दुथडी भरुन वाहत असून संतिबस्तवाड जुन्या पुलाजवळ नदी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होवू लागली आहे.

मुंगेत्री नदीचे उगमस्थान किणये डोंगरभागात आहे. किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे आदी परिसरातील शेतकऱयांसाठी ही महत्त्वाची नदी आहे. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पश्चिम भागात अधिक पाऊस होत आहे. मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु होता. दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. यामुळे नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

मुंगेत्री नदी झाडे-झुडपे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. उन्हाळय़ातच या नदीची साफसफाई करुन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱयांनी केली होती. मात्र, या भागातील ग्रामपंचायती व लघु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने यंदाही अतिवृष्टी झाल्यास नदीच्या आजूबाजूच्या शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार हे निश्चित.

नदीचे पाणी शिवारात

किणयेत धरण झाल्यापासून नदीच्या पाणी पातळीत अधिक वाढ होत आहे. धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. यावेळी अचानक नदीमध्ये पाणीसाठा झाला आणि नदीचे पाणी नदीकाठावरच्या शिवारामध्ये शिरले आहे. यावेळी शेतातील बांध फुटण्याचे प्रकार घडले. नदीच्या पाण्यामुळे लागवड करण्यात आलेली रताळी वेल तसेच भातपिके नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. यामध्ये किणये व बहाद्दरवाडी येथील शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान अधिक झाले आहे.

भात पिकासाठी दिलासादायक

पेरणी करण्यात आलेली भातपिके बऱयापैकी बहरुन आली आहेत. या भात पिकासाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. तसेच नाचणा लागवडीसाठी पाऊस महत्त्वाचा ठरला आहे. पावसामुळे शेतशिवारात अधिक पाणी साचल्यामुळे रोप लागवडीची कामे खोळंबलेली आहेत. रोप लागवडीकरिता पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यास रोप लागवड करणे सोयीचे ठरणार आहे, असे शेतकऱयांनी सांगितले.

मंगळवारी दिवसभर तालुक्यासह पश्चिम भागात पावसाची संततधार सुरुच होती. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून अवघा तालुका गारठून गेला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास तालुक्याच्या विविध गावांमधील नाल्यांवरील पुलांवर पाणी येण्याचा धोका आहे.

Related Stories

तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन

Omkar B

रेल्वे स्थानकाला डॉ. शिवबसव स्वामीजींचे नाव द्या

Patil_p

रिसायकल प्लँट कार्यान्वित झाल्याने पाण्याचा पुनर्वापर

Amit Kulkarni

बेळगाव न्यायालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

Amit Kulkarni

खासबागमध्ये होळी कामाण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना

Amit Kulkarni

घर पडून वर्ष झाले तरी कोणीच फिरकले नाही

Patil_p
error: Content is protected !!