Tarun Bharat

भारतात पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य

एकेकाळी जल समृद्धीमुळे आपला भारत देश सुजलाम् आणि सुफलाम् ओळखला जात होता परंतु भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना, देशातल्या जलस्रोतांची स्थिती, दयनीय अवस्थेला त्यांच्या एकंदर गैरव्यवस्थापनामुळे त्याचप्रमाणे वाढत्या उष्माघातापायी पोहोचलेली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य भेडसावणाऱया राष्ट्रांच्या यादीत आशिया खंडात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश बरेच अग्रक्रमी आहेत.

आपल्या देशाची जलनीती सिंचन केंद्रित असून, त्यामुळेच 85 टक्के उपलब्ध गोडय़ा पाण्याचा उपयोग शेती, बागायतीच्या सिंचनास केला जात आहे. पंजाब, हरियाणा त्याचप्रमाणे पश्चिमी उत्तर प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस तीव्र होत चाललेले आहे. 2019 साली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार देशातल्या 21 महानगरात उपलब्ध असलेले भूजल संपण्याची शक्यता आहे. आज देशभर भूजलाचा वारेमाप वापर होत असून, जगातल्या उपलब्ध एक चतुर्थांश भूजलाचा वापर आपल्या भारतात होत आहे. जगात भूजलाचा वारेमाप वापर करणाऱया देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. साधारणपणे 251 बिलीयन क्यूबिक मीटर भूजलाचा आपल्या देशात उपयोग होत असून, त्यातल्या 60 टक्के पाण्याचा सिंचनासाठी तर 85 टक्के पेयजल म्हणून केला जात आहे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे जल गुणवत्ता खूपच खालावलेली असून 122 देशांच्या यादीत आपला क्रमांक 120 वर घसरलेला आहे.

भारतात जल प्रदुषणाची समस्या अत्यंत गंभीर असून साथीच्या असंख्य रोगांना प्रदूषित पाणी महत्त्वाचे कारण ठरलेले आहे. देशातले 70 टक्के पाणी प्रदुषित असून 1955 साली तामिळनाडूमध्ये जपानी हत्तीरोगाचे रुग्ण आढळले होते. आज हत्तीरोगासमवेत अन्य साथीच्या रोगांपासून देशातल्या 17 राज्यात जलउद्भव रोगांनी उच्छाद मांडलेला आहे. भारत सरकारने पुरवठय़ाची योजना आखलेली असून 2024 पर्यंत देशातल्या समस्त ग्रामीण भागांना सुरक्षित पेयजलाचा पुरवठा करण्याची घोषणा केलेली आहे परंतु असे असले तरी नळांद्वारे सुरक्षित पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी जलस्रोतांत पिण्यायोग्य पाणी शिल्लक राहणे गरजेचे आहे. आजच्या घडीस भारतातल्या 256 जिल्हय़ांतल्या 1592 क्षेत्रांत पाण्याचे दुर्भिक्ष्य बऱयाच शिगेला पोहोचलेले आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातले सहाशे दशलक्ष लोक पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जात आहेत.

आपला देश स्वतंत्र झाला त्यावर्षी म्हणजे 1947 साली दरडोई पाण्याची उपलब्धता 6042 क्यूबिक मीटर इतकी होती. 2021 साली त्यात विलक्षण घट होऊन ती 1486 क्यूबिक मीटरपर्यंत घसरलेली आहे. मोठय़ा प्रमाणात खालावत जाणारी भूजलाची पातळी, भू-पृष्ठावरील वाढते जलप्रदूषण आणि नदी-नाले, विहिरी, तलाव यासारख्या जलस्रोतांवरती होणारे अक्षम्य अतिक्रमण यामुळे पाण्याची दरडोई उपलब्धता झपाटय़ाने खालावत चालली आहे. संपूर्ण जगातील सोळा टक्के लोकसंख्या ज्या भारतात राहते, तेथे केवळ चार टक्के पेयजल उपलब्ध आहे, ही धक्कादायक बाब आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे आगामी काळात देशाचा एकूण विकासाचा दरही सहा टक्क्यांनी कमी होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आजच्या घडीस भारतात उघडय़ावर शौचास जाणाऱयांचे प्रमाण पंधरा टक्के असून, नदी-नाले आणि जलस्रोतांची स्थिती मल-मूत्रामुळे खालावत चालली आहे. उघडय़ावर मलमूत्र विसर्जन केले जात असल्याने जल प्रदुषणाबरोबर परिसरात अनारोग्य आणि दुर्गंधीचा प्रसार होत असतो. झोपडपट्टीत त्याचप्रमाणे पक्के घर नसलेल्या लोकांमार्फत उघडय़ावरती मलमूत्र विसर्जन होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

आज देशातल्या बहुतांश भू-भागाला पेयजल आणि सिंचनाचा पुरवठा करणाऱया नद्यांत कृष्णा, कावेरी आणि गोदावरी या नद्या आहेत. आज या नद्यांवर ठिकठिकाणी धरणांची पेयजल, सिंचन, जलविद्युत निर्मिती करण्यासाठी साखळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे मान्सून मोसमात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे महापूराचा तडाखा आणि हिवाळा, उन्हाळय़ात पाण्याचा खडखडाट ही स्थिती निर्माण झालेली आहे. भारताच्या एक पंचमांश भू-भागातून वाहणारी गोदावरी नदी धरणांच्या साखळीबरोबर तिच्या पाण्यात मलमूत्र, सांडपाणी, केरकचरा टाकला जात असल्याने भयानकरित्या प्रदुषित झालेली आहे. जी पैठणची नगरी विद्वत्ता, कलाकुसर, शौर्य यामुळे नावारुपास आली होती, त्या शहरातली गोदावरी प्रदुषणाची शिकार ठरलेली आहे. ऊस लागवडीबरोबर अन्य कृषी आणि बागायती पिकांसाठी कृष्णेच्या पाण्याचा वापर पराकोटीला पोहोचलेला असून तिच्या पाण्याच्या वाटपाखातर स्थापन करण्यात आलेल्या जलविवाद लवादाला अक्षरशः कसरत करावी लागत असते. ब्रह्मपुत्रा ही भारतातली सगळय़ात लांब नदी असून, ती आज आसामसारख्या राज्यात वारंवार महापुरांचे संकट आणण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरलेली आहे. जी गंगा प्राचीन काळापासून भारतीय ऋषीमुनी आणि संत-महंत यांच्यासाठी पवित्र ठरली, त्या गंगेला आज ठिकठिकाणी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. दिल्ली महानगर आणि परिसरातल्या जनतेने यमुनेला सर्वाधिक प्रदुषित नदी केलेली आहे.

एकेकाळी इथल्या राज्यकर्त्यांनी पावसाळय़ानंतर जो पाण्याचा तुटवडा निर्माण होतो आणि पेयजलाची प्राप्ती दुरापास्त ठरते, त्याच्याशी सामना करण्यासाठी डोंगरमाथ्यावरच्या किल्ल्यात किंवा भूईकोटात हौद, तलावासारख्या जलाशयांची निर्मिती करून जल व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध विनीयोग यांचे आदर्श प्रस्थापित केले. डोंगर उतारावरच्या धावत्या पाण्याला अडविण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था निर्माण केली. मध्यप्रदेशसारख्या राज्यातल्या डोंगर माथ्यावरच्या मंडुत जहाजमहल येथे अस्तित्वात असलेले जलाशय आणि पावसाचे पाणी छप्परावती गोळा झाल्यावर थेंब थेंब पाणी गोळा करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, ती इथल्या राज्यकर्त्यांची, वास्तुविशारदांची कल्पकता आणि दूरदृष्टीचा प्रत्यय आणून देते. राजस्थानात वाळवंटी प्रदेशातल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जाण्यासाठी जल व्यवस्थापनाचे तंत्र वेळोवेळी उपयोगात आणले होते. आज पूर्वजांच्या जलसंधारण, जल व्यवस्थापनाच्या पारंपरिक तंत्रज्ञानाचा उपयोग जेथे शक्य आहे, तेथे करणे गरजेचे आहे.

नदी-नाले, तळय़ा, तलाव यांच्यासाठी जलसंचय क्षेत्राला सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. आज ज्या नद्यांवर धरणे, विद्युत प्रकल्पांची उभारणी केलेली आहे, त्यांच्या एकंदर जलसंचय क्षेत्रावरती, परिसरातल्या जंगल क्षेत्रावरती घाला घातल्याने तेथील नद्यांची त्याचप्रमाणे गाळ साचल्याकारणाने जलाशयांची स्थिती बिकट झालेली आहे. शेती, बागायतीसाठी आवश्यक जलसिंचन आणि पेयजलाचा उपसा करण्याच्या हेतूने राज्या-राज्यांतला वादंग शिगेला पोहोचलेला आहे. आज हवामान बदल आणि एकंदर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करून जल व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला भूजल गायब होत चालले तर दुसऱया बाजूला भू-पृष्ठावरचे पाणी प्रदुषित होऊ लागले आहे, याचा विचार करून त्वरित कृती केली नाही तर पेयजल आणि सिंचनासाठीचा संघर्ष आणखीन तीव्र होणार आहे, हे ध्यानात ठेवून ठोस उपाययोजना केली पाहिजे.

– राजेंद्र पां. केरकर

Related Stories

टेकडय़ावरील वस्त्यांमधील दहशत, भीती

Patil_p

कोरोना लढय़ात एकत्र येण्याची गरज

Patil_p

मानवतेचा अंतःस्वर !

Amit Kulkarni

लसीच्या उत्सुकतेची अतिशयोक्ती

Patil_p

स्वधर्म महात्म्य

Patil_p

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ः एक झलक

Patil_p