महावीर भवन येथे सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत
प्रतिनिधी / बेळगाव
स्वातंत्र्यदिनानिमित्त जितोच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या दरम्यान महावीर भवन येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आजादी का अमृतमहोत्सवनिमित्त रक्तदात्यांसाठी विशेष योजना आखली असून एक वर्षाच्या कालावधीसाठी 1 लाखांचा विमा योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करून जीव वाचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जितोच्यावतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अभय आदीमनी यांनी रक्तदान शिबिर व योजनेची माहिती दिली. ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट आणि विविध 20 संघटनांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता 450 युनिट रक्तसाठा जमा झाला होता. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. यंदा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असल्याने 750 हून अधिक युनिट रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. केवळ गरजूंना रक्त देऊन जीवदान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. आजादी का अमृतमहोत्सवनिमित्त यंदा रक्तदात्यांसाठी विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रक्तदात्यांना अपघाती विम्याचा लाभ मिळणार आहे.
जितोच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच अंतर्गत केएलई ब्लड बँक, बिम्स ब्लड बँक, महावीर ब्लड बँक आणि बेलगाम ब्लड बँक यांच्या सहकार्याने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये सहभाग घेऊन सहकार्याचे आवाहन संघटनेच्यावतीने अभय आदीमनी, हर्षवर्धन इंचल, संघटनेचे अध्यक्ष पुष्पक हणमण्णावर, मुख्य सचिव अमित जोशी, रतन रामगौडा आदींनी केले.