इंडो-श्रीलंका मास्टर जलतरण स्पर्धेत चमक
बेळगाव : नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या निमंत्रितांच्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या इंद्रजीत हलगेकर व ज्योती होसट्टी यांनी चमकदार प्रदर्शन करीत भारतासह बेळगावचेही नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
इंडो-श्रीलंका येथे निमंत्रितांच्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आरोग्य खात्यातील अधिकारी ज्योती होसट्टी व इंद्रजीत हलगेकर यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन स्विमर्स क्लब व ऍक्वेरियस क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनएमसीच्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कारंजीमठाचे गुरूसिद्ध स्वामिजी, आमदार अनिल बेनके, अविनाश पोतदार, डॉ. प्रभाकर कोरे, केएलईचे उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, लता कित्तूर, माखी कापाडीया यांच्या हस्ते ज्योती होसट्टी व इंद्रजीत हलगेकर यांचा खास सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेत 12 पदकांसह इंद्रजीतने 4 सुवर्ण, 2 रौप्य तर ज्योती होसट्टीने 7 प्रकारात 4 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक पटकावले.