वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
रिषभ पंत (111 चेंडूत 146) व रविंद्र जडेजा (नाबाद 83) यांच्या काऊंटर ऍटॅक पार्टनरशिपमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 7 बाद 338 अशी मजबूत धावसंख्या उभारली. प्रारंभी पडझडीमुळे भारताची एकवेळ 5 बाद 98 अशी दाणादाण उडाली होती. मात्र, नंतर या जोडीने 36.3 षटकात सहाव्या गडय़ासाठी 222 धावांची मोठी भागीदारी साकारली. दिवसअखेर जडेजा 163 चेंडूत 83 तर शमी 11 चेंडूत शून्यावर खेळत होते.
शुक्रवारी पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आला आणि दुसऱया सत्रापूर्वी एका तासाचा खेळ वाया गेला. त्यानंतर खेळाला नव्याने सुरुवात झाल्यानंतरही भारताची पडझड सुरुच राहिली आणि पाहता पाहता संघाचा डाव 5 बाद 98 असा गडगडला होता.
अनुभवी जेम्स अँडरसन पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. शिवाय, त्याला नवोदित मॅथ्यू पॉट्सने दोन प्राईज विकेटसह समयोचित साथ दिली. पॉट्सच्या गोलंदाजीवर विराट कोहली (11) व हनुमा विहारी (20) खराब फटक्यावर बाद होत परतले. विहारीला पॉट्सने पायचीत केले तर विराटने द्विधा मनस्थितीत खेळलेला बाहेर जाणारा चेंडू यष्टीवर ओढवून घेण्याची चूक केली. त्यापूर्वी मात्र, विराटची फलंदाजी आश्वासक भासत होती.
भारताबाहेर आपली पहिलीच कसोटी सामना खेळत असलेला श्रेयस अय्यर (11 चेंडूत 15) पॉट्सच्या गोलंदाजीवर 3 चौकार वसूल करण्यात यशस्वी ठरला असला तरी अँडरसन व त्याच्या सपोर्ट स्टाफने अय्यरच्या फलंदाजीचा पुरेपूर अभ्यास केला असल्याचे लवकरच अधोरेखित झाले. 39 वर्षीय अँडरसनने त्याला रिब केज एरियातील चेंडूवर सॅम बिलिंग्जकरवी झेलबाद
केले.
भारतासाठी बिकट स्थिती असताना याचवेळी पंत व जडेजा ही जोडी क्रीझवर जमली आणि त्यांनी विकेट न गमावता धावफलक हलता ठेवण्यावर बरीच मेहनत घेतली. पंतने संधी मिळाल्यानंतर अगदी अँडरसनच्या गोलंदाजीवरही काही उत्तम फटके लगावले. त्याने ब्रॉडला स्ट्रेटड्राईव्ह व कव्हरड्राईव्हचे लगावलेले फटके लक्षवेधी ठरले.
दडपणाखालील इंग्लिश कर्णधार स्टोक्सने डावखुरा फिरकीपटू जॅक लीचकडे चेंडू सोपवला. पण, पंतने लीचला 2 चौकार व एक स्ट्रेट षटकार खेचत याचाही पुरेपूर लाभ घेतला. या उभयतांच्या फटकेबाजीमुळे भारताला पावणेदोनशे धावांच्या उंबरठय़ावर पोहोचता आले.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ः 73 षटकात 7 बाद 338 (रिषभ पंत 111 चेंडूत 19 चौकार, 4 षटकारासह 146, रविंद्र जडेजा 163 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 83, हनुमा विहारी 53 चेंडूत 1 चौकारासह 20, शुभमन गिल 17, चेतेश्वर पुजारा 2 चौकारांसह 13, विराट कोहली 11, श्रेयस अय्यर 11 चेंडूत 3 चौकारांसह 15. अवांतर 32. जेम्स अँडरसन 19 षटकात 52 धावात 3 बळी, मॅथ्यू पॉट्स 17 षटकात 2-85).