यजमान झिम्बाब्वेविरुद्ध दुसरी वनडे आज ः केएल राहुलसाठी फलंदाजीचा पुरेसा सराव अपेक्षित
हरारे / वृत्तसंस्था
भारतीय संघ आज (शनिवार दि. 20) झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी एकीकडे संघासमोर एकतर्फी मालिकाविजयाचे लक्ष्य असेल तर दुसरीकडे, केएल राहुलसह त्याच्या सहकाऱयांना फलंदाजीचा पुरेसा सराव मिळणे अपेक्षित असेल. ही लढत देखील पहिल्या लढतीप्रमाणे हरारेमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरु होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरुन त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
भारत-झिम्बाब्वे संघ कोणत्याही निकषावर समसमान ताकदीचे नाहीत. एकीकडे, भारतीय संघात जागतिक दर्जाचे एकापेक्षा एक, सरस असे स्टार खेळाडू आहेत तर दुसरीकडे, झिम्बाब्वेचा संघ एखाद्या प्रथमश्रेणी संघापेक्षाही कमी ताकदीचा आहे, असे म्हटले तर गैर ठरु नये. झिम्बाब्वे संघात एकही अव्वल गोलंदाज नसला तरी केएल राहुल व सहकारी फलंदाजांना प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी येथे मिळेल.
यापूर्वी, पहिल्या वनडेत गोलंदाजांना दुसऱया सत्रात अतिशय कमी मदत लाभल्याचे दीपक चहरने नमूद केले होते. त्या पार्श्वभूमीवर, आजच्या लढतीतही पहिल्या तासाभरात फलंदाजांची पारख होऊ शकते. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीला सामोरे जाण्यापूर्वी येथे भारतीय आघाडीवीरांना पुरेसा सराव मिळणे अर्थातच क्रमप्राप्त असेल.
केएल राहुलने पहिल्या लढतीत शिखर धवन व शुभमन गिल यांच्या सलामी जोडीत फेरफार करण्याचा मोह टाळला असला तरी फलंदाज म्हणून स्वतःला फलंदाजीची संधी मिळणे त्याच्यासाठी तितकेच महत्त्वाचे असणार आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये फारशी ताकद नाही. त्यामुळे, राहुलला फलंदाजीत काही प्रयोग निश्चितपणाने राबवून पाहता येतील.
दीपक हुडाला फलंदाजीत आघाडीवर संधी देण्यात आल्यास त्याचे मनोबलही उंचावू शकेल. हंगामी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडून काही प्रयोग राबवण्यापूर्वी मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिक भर देणे अपेक्षित आहे. शिखर धवनची हाताची दुखापत चिघळल्यास इशान किशन व केएल राहुल, असे ‘लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन’ सलामीला उतरवण्याचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध असेल.
मालिकाविजय संपादन करणे महत्त्वाचे असेल. त्याचबरोबर ‘प्रेशर कूकर सिनॅरिओ’ कसा हाताळायचा, याचे युवा खेळाडूंना अधिक धडे मिळणे महत्त्वाचे असेल. पहिल्या वनडेत दीपक चहरने एका बाजूने सलग 7 षटके गोलंदाजी करणे भारतासाठी सुचिन्ह ठरले. याशिवाय, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज ‘बॅक ऑफ लेंग्थ व्हेरिएशन’वर अधिक भर देतील, अशी अपेक्षा असणार आहे.
संभाव्य संघ
भारत ः केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
झिम्बाब्वे ः रेगिस चकबवा (कर्णधार), रियान बर्ल, तनाका चिवंगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जाँग्वे, इनोसन्ट काईया, टॅकूवॅनशे कैतानो, क्लाईव्ह मॅदन्डे, वेस्ले मेधेव्हेरे, तदिवन्शे मरुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योगा, रिचर्ड नॅग्रव्हा, व्हिक्टर न्ययूची, सिकंदर रझा, मिल्टॉन शुम्बा, डोनाल्ड तिरिपॅनो.
सामन्याची वेळ ः दुपारी 12.45 वा.
थेट प्रसारण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क