वृत्तसंस्था /नवी मुंबई
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर आला असून आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवारी येथे डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत दोन महिन्यांच्या कालावधीनंतर होणाऱया आयसीसीच्या महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची या मालिकेत सत्वपरीक्षा ठरणार आहे.
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शौकिनांचा चांगला प्रतिसाद लाभण्याची शक्मयता आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले असून ऍलिसा हिली ऑस्ट्रेलियाची कर्णधार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाला आता ऋषिकेश कानिटकर हे नवे प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत. भारतीय महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक रमेश पोवार यांची तीन दिवसांपूर्वी अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेमध्ये पाकविरुद्धच्या लीग सामन्यात रमेश पोवार यांनी अनेक नवोदितांना संधी देऊन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता आणि या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. या कारणामुळे कदाचित रमेश पोवार यांना त्यांच्या पदावरून गच्छंती देण्यात आली असावी. बलाढय़ ऑस्ट्रेलियाबरोबर भारतीय महिला संघाचा यापूर्वीचा शेवटचा सामना ऑगस्ट महिन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झाला होता. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले होते.
या टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघाची फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार हरमनप्रित कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा यांच्यावर राहील. अलीकडे कर्णधार हरमनप्रित कौरलाही फलंदाजीचा सूर मिळाल्याने या मालिकेत तिच्याकडून मोठी अपेक्षा बाळगली जात आहे.
हरलिन देवोल तसेच यास्तिका भाटिया यांचे संघात पुनरागमन झाले आहे. या दोन्ही खेळाडूंनी चॅलेंजर करंडक स्पर्धेत आपल्या फलंदाजीत सातत्य ठेवले होते. तसेच फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू देविका वैद्यने तब्बल आठ वर्षांनंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे. रेणुका सिंग ठाकुर ही संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज असून तिला अंजली सर्वानीची साथ राहील.
भारत संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकुर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वैद्य, एस. मेघना, रिचा घोष, हरलिन देवोल.
ऑस्ट्रेलिया संघ- ऍलिसा हिली (कर्णधार), मॅकग्रा (उपकर्णधार), ब्राऊन, कॅरे, गार्डनर, गॅरेथ, ग्रॅहॅम, हॅरिस, जोनासेन, ऍलिना किंग, लिचफिल्ड, बेथ मुनी, एलीस पेरी, मेगन स्कट आणि सुदरलँड.