वनडे विश्वचषक नजरेसमोर ठेवत फलंदाजी सुधारण्यावर भारताचे लक्ष
वृत्तसंस्था/ मिरपूर
भारताचा यजमान बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना आज रविवारी होत असून सलामीच्या जागेसाठी सातत्यपूर्ण खेळी करणारा शिखर धवन व प्रतिभावान केएल राहुल यांच्यात चुरस असेल. या सामन्यात भारताचा पूर्ण ताकदीचा संघ उतरणार असून बांगलादेशविरुद्ध विजयी प्रारंभ करण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. सकाळी 11.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या मालिकेसाठी आणखी एक सातत्यपूर्ण खेळणारा शुबमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. तो या संघात असता तर प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर सलामीच्या निवडीचा पेच निर्माण झाला असता. यापुढे वर्षभर पूर्णपणे लक्ष केंद्रित असेल ते वनडे सामन्यांवर. टी-20 प्रमाणे वनडेतही भारताला अप्रोचमध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. अनेक पर्याय उपलब्ध असतात तेव्हा ती डोकेदुखी तर असतेच, पण गोंधळही निर्माण करणारी असते. समान बलस्थाने असणाऱया खेळाडूंना प्रशिक्षक समान संधी देण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे स्थिरावलेला संघ मिळण्यात अडचण निर्माण होते. महत्त्वाची स्पर्धा जवळ असताना अशी स्थिती निर्माण होणे हे चांगले लक्षण नाही. सध्याचा व्हाईटबॉल भारतीय संघ याच परिस्थितीतून जाताना दिसतोय.
काही वर्षापूर्वी रोहित शर्मा व शिखर धवन यांना वनडेमध्ये सलामीला प्राधान्य दिले जायचे. त्यांचे स्थान बराच काळ अबाधित होते. पण पॉवरप्लेमध्ये धवनचा होणारा संथ खेळ आणि शुबमन गिलचा संभाव्य सलामीवीर म्हणून झालेला उदय यामुळे सलामीच्या जोडीला पर्याय उपलब्ध झाला. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या अखेरच्या टप्प्यात केएल राहुल काही सामन्यात मध्यफळीत खेळला. पण त्याला सलामीला खेळणे आवडते आणि त्या जागेवर त्याने बऱयापैकी यशही मिळविले आहे. या सगळय़ांची आकडेवारी पाहता कोणतेच चित्र स्पष्ट होत नसल्याने रोहितसमोर आपल्या जोडीदाराबाबत थोडासा संभ्रमच असेल.
या वर्षात 19 वनडेमध्ये धवन सलामीला खेळला असून त्याचा स्ट्राईकरेट 75.11 इतका कमी राहिला आहे. पण 2016-18 या कालावधीत हा स्ट्राईकरेट 101 होता तर 2019-21 या अवधीत तो पुन्हा खालावला (91) असला तरी तो आधीपेक्षा बरा स्ट्राईकरेट होता. केएल राहुलने 45 वनडेत 85 हून अधिकच्या स्ट्राईकरेटने 5 शतके, 10 अर्धशतके नोंदवताना 45 ची सरासरी राखली. त्यामुळे धवनपेक्षा तो सरस उमेदवार वाटतो. याशिवाय धवन नुकताच न्यूझीलंडहून मिरपूरमध्ये दाखल झाला असल्याने त्याला विश्रांती मिळावी यासाठी पहिल्या सामन्यात राहुललाच संधी दिली जाणार आहे.
तिसऱया क्रमांकासाठी कोहलीची निवड निश्चित असून चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हळूहळू स्थिरावतोय. रिषभ पंतने इंग्लंडमध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळे पाचव्या क्रमांकासाठी इशान किशनऐवजी त्याला पसंती दिली जाईल. टी-20 मध्ये पंत अनेकदा स्वस्तात बाद झाला असल्याने त्याच्यावर बरीच टीका झाली आहे. तरीही वनडेसाठी यष्टिरक्षक म्हणून त्यालाच प्रथम पसंती दिली जाईल. टी-20 मध्ये सलामीस खेळणाऱया इशान किशनने वनडेमध्ये तिसऱया किंवा चौथ्या क्रमांकावर खेळताना तीनही अर्धशतके नोंदवली आहेत. इशानकडे फिनिशर म्हणून पाहिले जात नाही. त्यामुळे त्याला पहिल्या चारमध्येच सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र केएल राहुलने यष्टिरक्षण करण्याचे निश्चित केल्यास या प्रश्नाला काहीच अर्थ राहणार नाही. स्थानिक क्रिकेट व आयपीएल गाजविणाऱया रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी यांनाही या मालिकेत एखादा सामना मिळण्याची आशा आहे.
गोलंदाजीत मोहम्मद शमी जखमी असल्याने त्याच्या जागी उमरान मलिकला संधी मिळाली आहे. न्यूझीलंडमध्ये सीम गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर त्याने चांगले प्रदर्शन केले. आता फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टय़ावर त्याला आपली क्षमता दाखवून द्यावी लागेल. दीपक चहर, सिराज व शार्दुल ठाकुर यांची निवड निश्चित मानली जाते.
बांगलादेशचे नेतृत्व लिटॉन दास करीत असून तस्किन अहमद, तमिम इक्बाल यांच्या गैरहजेरीत त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. मुस्तफिजूर रहमान, इबादत हुसेन, शकीब अल हसन हे त्यांचे प्रमुख गोलंदाज असतील. पण ते मात्र पुरेसे भेदक वाटत नाही.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, दावन, कोहली, श्रेयस अय्यर, पंत, इशान किशन, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप सेन, उमरान मलिक, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, सिराज.
बांगलादेश ः लिटॉन दास, अनामुल हक, शकीब हसन, मुश्फिकुर रहीम, अफिफ हुसेन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद, हसन मेहमूद, इबादत हुसेन, नसुम अहमद, मेहमूद उल्लाह, नजमुल हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शोरिफुल इस्लाम.
सामन्याची वेळ ः सकाळी 11.30 वा.
थेट प्रक्षेपण ः सोनी नेटवर्क.
विश्वचषक फुटबॉल
आजचे उपउपांत्यपूर्व सामने
1) फ्रान्स वि. पोलंड
वेळ ः रात्री 8.30 वा.
2) इंग्लंड वि. सेनेगल
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.