महाबलीपूरम / वृत्तसंस्था
उत्तम बहरात असलेल्या भारतीय ब संघाने शनिवारी 44 व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत इस्टोनियाचा 4-0 असा एकतर्फी फडशा पाडला. दुसरे मानांकन लाभलेल्या भारत अ संघाने अन्य एका लढतीत मोल्दोव्हाचा 3.5 विरुद्ध 0.5 फरकाने पराभव केला. अ संघासाठी हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.
पहिल्या फेरीत न खेळलेल्या वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने येथे जॉर्ज मेयरचा पराभव केला. नॉर्वेने उरुग्वेविरुद्ध लढतीत 4-0 असा सहज विजय मिळवला. अव्वल दर्जाच्या अमेरिकन संघाला मात्र पराग्वेविरुद्ध विजयासाठी 2.5 विरुद्ध 1.5 असे झगडावे लागले. त्यांना पहिल्या दिवशीही अँगोलाविरुद्ध अर्धा गुण गमवावा लागला होता.
महिला गटात भारत अ संघाने अर्जेन्टिनाविरुद्ध विजयी आघाडी घेतली. कोनेरु हंपीला मॅरिसा झुरियेलने 44 चालीत बरोबरीत रोखले. पण, तानिया सचदेव व भक्ती कुलकर्णी यांनी शानदार विजय मिळवले. महिला गटात भारताच्या क संघाने सिंगापूरला 3-1 असे नमवले. पुरुष गटात भारत अ संघातर्फे पी. हरिकृष्णा, एस. एल. नारायणन व के. शशिकिरण यांनी शानदार विजय मिळवले. फक्त अर्जुन एर्गेसीला बरोबरीवर समाधान मानावे लागले.