वृत्तसंस्था/ ढाका
येथे सुरू असलेल्या महिलांच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत रविवारी भारतीय महिला फुटबॉल संघाचा सामना भुतानबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला यजमान बांगलादेशकडून हार पत्करावी लागल्याने त्यांना रविवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे.
भारतीय महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला चांगला प्रारंभ केला होता. गेल्या सोमवारच्या सामन्यात भारताने नेपाळवर 4-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला होता. पण त्यानंतर शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात यजमान बांगलादेशने भारतावर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. शुक्रवारच्या सामन्यात 16 व्या मिनिटाला भारतीय संघातील अखिला राजनने हेडरद्वारे मारलेला चुकीचा फटका भारतीय गोलपोस्टमध्ये गेल्याने बांगलादेशला हा एकमेव गोल बोनसच्या रूपात मिळाला होता. या स्पर्धेमध्ये एकूण पाच संघांचा समावेश आहे. भुतानचा संघ या स्पर्धेच्या गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत. बांगलादेशने त्यांचा पहिल्या सामन्यात 8-1, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेपाळने भुतानचा 5-0 तर त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रशियाने भुतानचा 9-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. भारतीय संघाचे या स्पर्धेतील आता दोन सामने बाकी असून भारतीय संघ या उर्वरित सामन्यात अधिक दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास भारतीय संघाच्या प्रशिक्षकाने व्यक्त केला आहे.