वृत्तसंस्था/ हो ची मीन सिटी
फिफाच्या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या शनिवारी येथे झालेल्या फुटबॉल सामन्यात सिंगापूरने भारताला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात सिंगापूरने पूर्वार्धात आघाडी घेतली होती पण त्यानंतर भारताने मध्यंतरापूर्वीच गोल नोंदवून बरोबरी साधली होती.
या सामन्यात 37 व्या मिनिटाला सिंगापूरच्या इकसेन फंडीने 25 यार्ड अंतरावरुन फ्री किकवर गोल केला. 43 व्या मिनिटाला कर्णधार सुनील छत्री दिलेल्या पासवर आशिकी कुर्नियनने भारताला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धात उभय संघांना गोल नोंदविता आला नाही. फिफाच्या ताज्या मानांकनात भारत 104 व्या तर सिंगापूर 159 व्या स्थानावर आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यात यापूर्वी 2012 साली झालेल्या सामन्यात सिंगापूरने भारताचा 2-0 असा पराभव केला होता. मात्र अलीकडच्या कालावधीत मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात यजमान व्हिएतनामने सिंगापूरचा 4-0 असा पराभव केला होता. आता भारत आणि यजमान व्हिएतनाम यांच्यातील शेवटचा मित्रत्वाचा सामना मंगळवारी होणार आहे.