Tarun Bharat

भारतात अडीच लाख वर्षांपूर्वीपासून मानववस्ती

Advertisements

अश्म आयुधांच्या कार्बन डेटिंगवरुन हाती आला महत्वाचा निष्कर्ष

@ वडोदरा / वृत्तसंस्था

भारतात ‘बुद्धिमान मानवा’चे (होमो सेपियन) आगमन आफ्रिकेतून साधारणतः सव्वा लाख वर्षांपूर्वी झाले, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र हा समज खोटा ठरविणारी काही तथ्ये संशोधकांच्या हाती लागली आहेत. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशातील उत्खननात सापडलेली अश्म आयुधे (दगडी अवजारे) साधारणतः अडीच लाख वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली आहेत, असा निष्कर्ष कार्बन आणि शास्त्रीय कालगणनेच्या आधारे काढण्यात आला आहे. त्यामुळे आफ्रिकेतून प्रगत मानवाचे स्थलांतर होण्यापूर्वी लाखो वर्षे भारतात मानवाचे वास्तव्य होते हे सिद्ध होत आहे.

आंध्रप्रदेशात 2018 मध्ये उत्खननात ही आयुधे आढळून आली आहेत. त्यांच्यामध्ये टोकदार दगडी भाल्याची टोके, दगडी कुऱहाडीसारख्या वस्तू, सुयीसारख्या टोकदार वस्तू आणि सपाट परशूसदृश साधने मोठय़ा प्रमाणात हाती लागली. गुजरातमधील अहमदाबाद येथील ल्युमिनिसन्स प्रयोगशाळेत या आयुधांच्या निर्मितीचा कालखंड शोधण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शोधण्यात  आलेला हा कालखंड किमान 2.46 लाख वर्षे इतका निघाला.

दिशा वळविणारे संशोधन

या संशोधनामुळे भारताच्या पुरातत्व कालखंडावर नव्याने प्रकाश पडणार आहे. आफ्रिकेतून येथे मानवाचे स्थलांतर होण्यापूर्वी भारतीय उपखंडात मानववस्ती नव्हतीच, असे आजवर शिकविण्यात आले आहे. तथापि, या नव्या संशोधनामुळे हा इतिहासच इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘भारतज्ञाना’ची दिशा यामुळे वेगळीकडे वळणार असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.

भारतातील मानवविकास पुरातन

भारतात मानवाचा विकास इतर भागांपेक्षा अधिक पूर्वी झालेला आहे, असे प्रतिपादन केले जाते. आजवर तो केवळ एक कल्पनाविलास मानला गेला होता. तथापि, गेल्या 15 वर्षांमध्ये झालेल्या नव्या संशोधनातून ही केवळ कविकल्पना नसून सत्य असू शकते, ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

उत्तर भारतातील संशोधन

उत्तर भारतात कच्छ (गुजरात), धाबा (मध्यप्रदेश), काटोटी (राजस्थान) आदी स्थानी केलेल्या उत्खननात साडपलेली आयुधे साधारणतः 1 ते 1.25 लाख वर्षांपूर्वीची आहेत. तथापि, दक्षिण भारतात आणखी अनेक स्थानी केलेल्या संशोधनात सापडलेली अवजारे त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाची असल्याने शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात यावर अधिक संशोधनाची आवश्यकता असून त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाऊ शकतो. तथापि, सध्या जे निष्कर्ष निघाले आहेत, ते प्रचलित समजुतींना धक्का देणारे आहेत हे निश्चित आहे.

बुद्धिमान मानवाचा जन्म नेमका कोठे…

आतापर्यंतच्या जगन्मान्य निष्कर्षानुसार आद्य मानवापासून बुद्धिमान मानवापर्यंत साऱया मानव प्रजातींचा जन्म आफ्रिकेत झालेला आहे. तेथून या प्रजाती जगाच्या इतर भागांमध्ये स्थलांतरित झाल्या. तथापि, या सिद्धांतावर काही जण आक्षेपही घेतात. जगात एकाच भूभागात मानवासारखा जीव विकसित कसा होऊ शकतो ? कदाचित अनेक स्थानी भिन्न भिन्न काळात मानवाचा विकास झालेला असला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या आफ्रिका सिद्धांत हाच प्रमाण मानला जातो. पण त्याला धक्का देणारे सत्य कदाचित पुढच्या काळात समोर येईल, असेही मानले जाते. एकंदर, पुरातन मानवासंबंधी गूढ असेच राहणार आहे.

 धक्का देणारे संशोधन

ड अहमदाबाद प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनाने प्रचलित समजुतींना धक्का

ड लाखो वर्षांपूर्वीपासून भारतात बुद्धिमान मानवाच्या वस्तीचे अनेक पुरावे

ड नव्या उत्खननातून हाती आलेल्या माहितीवर अधिक संशोधन केले जाणार

Related Stories

आसियानची एकात्मता भारतासाठी महत्वाची

Amit Kulkarni

भगवंत मान यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p

अमेरिकन कंपनी ‘KKR’ ची ‘जिओ’त 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 266 नवे रुग्ण; 7 मृत्यू

Rohan_P

बसपचे 6 आमदार ‘सायकल’वर स्वार

Patil_p
error: Content is protected !!