24, 27 सप्टेंबरला व्हिएतनाममध्ये सामन्यांचे आयोजन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे मित्रत्वाचे सामने सिंगापूर व यजमान व्हिएतनाम यांच्याविरुद्ध होणार असल्याचे राष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनने सांगितले.
सिंगापूरविरुद्धची लढत 24 सप्टेंबर रोजी तर 27 सप्टेंबरला व्हिएतनामविरुद्ध लढत होईल. फिफाने दिलेल्या विंडोमध्ये (19 ते 27 सप्टेंबर) व्हिएतनाम हे मित्रत्वाचे सामने आयोजित करीत आहे. 2022 एएफएफ मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून त्यांनी या सामन्यांचे आयोजन केले आहे. भारतीय संघ 22 सप्टेंबर रोजी व्हिएतनामला रवाना होईल आणि 28 सप्टेंबरला मायदेशी परतेल. यातील सामने हो चि मिन्ह शहरातील थाँग एन्हात स्टेडियमवर खेळविले जाण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती व्हिएतनाम फुटबॉल फेडरेशनने (व्हीएफएफ) आपल्या साईटवर दिली आहे.
व्हीएफएफने दिलेल्या माहितीनुसार, या तीन संघांत 21 ते 27 सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा होणार असून राऊंडरॉबिन फेरीनंतर सर्वाधिक गुण मिळविणाऱया संघाला चॅम्पियन घोषित केले जाणार आहे. भारतीय संघ सध्या फिफा मानांकनात 104 क्रमांकावर तर व्हिएतनाम 97 व सिंगापूर 159 व्या स्थानावर आहेत. दोन महिन्यांपूर्वी भारताने 2023 एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविल्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आगामी लढतीकडे पाहत आहे.
‘या आव्हानाला सामोरे जाताना आम्हाला आनंद वाटत आहे. आम्ही अलीकडे चांगले प्रदर्शन केले असून तोच जोम व दर्जा कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले. व्हिएतनाम दौऱयाआधी सराव शिबिर आयोजित करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असून केरळ ब्लास्टर्सविरुद्ध सराव सामना खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा वाटते, असेही ते म्हणाले.