Tarun Bharat

भारत जी-20 अध्यक्षपदी विराजमान

महत्त्वाकांक्षी, सर्वसमावेशक, निर्णायक, कृतीशील भूमिका घेणार : अमेरिकाही साहाय्य करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जगातील सर्वात मोठय़ा आर्थिक बळाची संघटना असलेल्या जी-20 च्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. गुरुवारी यापुढील एक वर्षासाठी भारताने या संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी समाधान व्यक्त केले असून ‘एक पृथ्वी, एक कुटुंब’ या उदात्त संकल्पनेचा पाठपुरावा या अध्यक्षपदाच्या काळात केला जाईल, असे प्रतिपादन  केले आहे. भारताने इंडोनेशियाकडून हे अध्यक्षस्थान घेतले आहे.

भारतासाठी ही मोठी सुसंधी असून भारत महत्त्वाकांक्षी, निर्णायक, सर्वसमावेशक आणि कृतीशील भूमिका साकारुन या संघटनेला अधिक बळ आणि महत्त्व मिळवून देण्यास कटिबद्ध आहे. सुसंवाद, आशावाद आणि उदारतावाद या तीन तत्त्वांवर भारत या परिषदेचा अध्यक्ष देश म्हणून आपले उत्तरदायित्व पार पाडेल. ‘मानवताकेंद्री जागतिकीकरण’ या नव्या संकल्पनेच्या आधारे आपण सर्वजण एकत्र कार्य करूया, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अन्नसुरक्षा महत्त्वाची

पर्यावरणस्नेही आणि शाश्वत जीवनशैली, जागतिक अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने यांचे आदान-प्रदान संकुचित राजकारणापासून मुक्त ठेवणे आदी आव्हानांशी आपल्याला दोन हात करायचे आहेत. आपली पठडीबद्ध मानसिकता आता सोडावी लागणार आहे. याच नकारात्मक मानसिकतेमुळे एका बाजूला तुटवडा आणि दुसऱया बाजूला संघर्ष अशा विचित्र स्थितीत सापडलो आहोत. ही जुनी जळमटे झटकून नव्या संकल्पना स्वीकारायची संधी आपल्याला आता मिळत आहे. ती स्वीकारल्यास भारताचा लाभ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आध्यात्मिक परंपरेचा आदर्श

भारताची आध्यात्मिक परंपरा एकात्मतेला प्राधान्य देणारी आहे. याच परंपरेतून प्रेरणा घेऊन आपण विश्वाचा विचार करतो. भारतीयांना ती सवय आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचे आव्हान त्यांच्यासाठी अवघड नाही. संपूर्ण मानवतेचा लाभ हे तत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये सामावलेले आहे. भारतीयांना मन मोठे करणे सहजसाध्य आहे, असे त्यांनी आपल्या अनेक ट्विट संदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

मानसिकता परिवर्तन आवश्यक

इतिहासकाळात मानवाला तुटपुंज्या साधनसामग्रीत भागवावे लागत असे. तुटवडा ही त्यावेळची वस्तुस्थिती होती. त्यामुळे मर्यादित स्रोत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मानवांच्या टोळय़ांमध्ये संघर्ष होत. या स्रोतांवर त्यांचे अस्तित्व अवलंबून होते. त्यामुळे अन्य मानवांना मिळू नयेत यासाठी प्रयत्न केला जात असे. आज अशी स्थिती राहिली नाही. पण दुर्दैवाने आपली मानसिकता मात्र तशीच राहिली आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ अधिक आहे तेही आणखी मिळविण्यासाठी संघर्ष करतात. या मनोवृत्तीमुळे विवाद निर्माण झाले आहेत, असे वक्तव्य त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना केले.

तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार

आधुनिक तंत्रज्ञानाने तुटवडय़ाच्या स्थितीवर पुष्कळशी मात केली आहे. समस्या सोडविण्याचे सामर्थ्य नव्या तंत्रज्ञानात आहे. भारतासाठी तर आधुनिक तंत्रज्ञान विशेष लाभदायक ठरणार आहे. पुढच्या पिढय़ांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा स्वीकार सर्व शंका दूर ठेवून केला पाहिजे. भारतात आज जगातील एक षष्ठांश लोकसंख्या आहे. भाषा, धर्म, परंपरा आदींचे मोठे वैविध्य आहे. याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास असामान्य प्रगती साधता येईल. आपण जी-20 अध्यक्षतेच्या काळात यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

अमेरिका भारताला साहाय्य करणार

जी-20 च्या अध्यक्षपदाचा भारताचा कार्यकाळ यशस्वी व्हावा यासाठी अमेरिका भारताला सहकार्य आणि साहाय्य करण्यास सज्ज आहे. अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आदी जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱया आव्हानांशी दोन हात करताना अमेरिका भारताच्या बरोबर राहील. तसेच शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठीही आम्ही दोन्ही देश एकत्रितरित्या कार्यरत राहू, असे प्रतिपादन व्हाईट हाऊसच्या वृत्तप्रसारण सचिव केरीन जीन-पेरी यांनी त्यांच्या संदेशात केले आहे. त्यांनी अमेरिकेच्या वतीने भारताचे अभिनंदन केले आहे.

वर्षभर भरगच्च कार्यक्रम

  • भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-20 चे अनेकविध कार्यक्रम
  • भारतात होणार 150 हून अधिक बैठका, महत्त्वाचे निर्णय होणार
  • अन्नसुरक्षा, तंत्रज्ञान आदान-प्रदान, ऊर्जासुरक्षेवर भारत देणार भर

Related Stories

योगगुरु बाबा रामदेव संतापले; पतंजलीच्या 5 औषधांचं उत्पादन बंद

Archana Banage

भारताकडून व्हिएतनामला भरीव मदत

Amit Kulkarni

राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक ; माती कपाळावर लावत जन्मभूमीला केलं वंदन

Archana Banage

सीबीएसई बारावीचा 99.37 टक्के निकाल

Patil_p

कोरोनावरून मोदी सरकारवर टीका करणे पडले महागात ; काही नेते व अभिनेत्यांचे ट्विट्स ब्लॉक

Archana Banage

कोरोना झाल्यास घाबरू नका

Patil_p