वृत्तसंस्था/ डब्लिन, आयर्लंड
येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या पाच देशांच्या महिला हॉकी स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने हॉलंडला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.
सोमवारी झालेल्या या सामन्यात भारतातर्फे अन्नूने 19 व्या मिनिटाला तर ब्युटी डुंगडुंगने 37 व्या मिनिटाला गोल केले. हॉलंडतर्फे ब्रोवर ऍम्बरने 13 व्या मिनिटाला व्हॅन डेर ब्रोएक बेलेनने 17 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत हॉलंडने पाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविल्याने भारतीय संघावर त्यांनी दडपण आणले होते पण भारताच्या बचावफळीची कामगिरी अधिक भक्कम झाल्याने हॉलंडला गोल करण्यापासून भारताने रोखले. 13 व्या मिनिटाला हॉलंडचे खाते ऍम्बरने मैदानी गोलवर उघडले. 17 व्या मिनिटाला बेलेनने हॉलंडची आघाडी वाढविली. 18 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अन्नूने भारताचे खाते 19 व्या मिनिटाला उघडले. मध्यंतरापर्यंत हॉलंडने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. 37 व्या मिनिटाला भारतीय संघाची उपकर्णधार ब्युटी डुंगडुंगने गोल नोंदवून आपल्या संघाला या सामन्यात बरोबरी साधून दिली. खेळाच्या शेवटच्या 15 मिनिटामध्ये हॉलंडला तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेल्याने हा सामना अखेर 2-2 असा बरोबरीत राहिला. भारतीय महिला हॉकी संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना युक्रेन बरोबर बुधवारी होत आहे.