वृत्तसंस्था / कोलकाता
येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर मंगळवारी एएफसी आशिया चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील ड गटातील तिसरा आणि शेवटचा सामना यजमान भारत आणि हाँगकाँग यांच्यात खेळविला जाणार आहे.
या सामन्याला शौकिनांचा चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. एएफसी आशिया चषक पात्रता तिसऱया फेरीतील ड गटातील होणाऱया या सामन्यात भारतीय संघ विजय मिळविण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल. हाँगकाँगने या स्पर्धेतील यापूर्वी झालेले अफगाण आणि कंबोडिया यांच्याविरूद्धचे सामने जिंकले आहेत. आता मंगळवारच्या सामन्यातील निकालानंतर या गटातील आघाडीचा संघ निश्चित होईल त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विजयी संघाला 2023 साली होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. 1956 साली झालेल्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदा हाँगकाँगने भूषविले होते आणि त्यांनी तिसरे स्थान पटकाविले होते. 1964 च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत हाँगकाँगने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. दरम्यान 1968 नंतर हाँगकाँगला आजपर्यंत एएफसी स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करता आलेली नाही तसेच त्यांना फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेमध्ये पात्रता फेरी पार करता आलेली नाही. 1986 साली फिफाच्या विश्व करंडक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत हाँगकाँगने चीनवर विजय मिळविला होता. 2022 फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पात्रता गटात हाँगकाँग शेवटच्या स्थानावर आहे. फिफाच्या मानांकनात सध्या हाँगकाँग 147 व्या स्थानावर आहे. दरम्यान भारतीय फुटबॉल संघाला यापूर्वी हाँगकाँग विरूद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.