राजषी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृति शताब्दी निमित्ताने महाराष्ट्राने शुक्रवार सहा मे रोजी सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना दिली. आधुनिक भारताची जडणघडण त्यांच्या विचाराने झाली. महायुद्धावेळी इंग्रज बंदुका बनवण्यासाठी किल्ल्यांवरील पोलादी तोफा नेणार हे जाणून आधीच तोफा वितळवून बनवलेले नांगर शेतकऱयांना वाटणारे हे राजर्षि. असा लोकराजा इतिहासात दुसरा नाही. जनतेने माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी, मी कोठेही कमी पडणार नाही. सत्ताधारी वर्गाचा खूपच दबाव येऊ लागला तर राजेपद युवराजाकडे सोपवून मी जनतेच्या सेवेत हजर होईन असे एखाद्या ऋषिप्रमाणे सांगणारे राजर्षि म्हणूनच मृत्यूनंतर शंभर वर्षांनीही लोकांच्या आदरस्थानी आहेत. भारतात कमकुवत जातींच्या प्रगतीसाठी नोकऱयांमध्ये आरक्षण देण्याचा कायदा करणारे, प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून बोर्डिंग काढून शिक्षणाची सोय लावणारे, स्त्री शिक्षणावर भर देणारे, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या पंक्तीत बसून जेवणारे, गंगाराम कांबळे सारख्या अन्यायग्रस्त व्यक्तीला हॉटेल काढायला मदत देऊन सरकारी अधिकाऱयांसह त्यांच्या हॉटेलमध्ये चहाला जाणारे आणि अस्पृश्याच्या हातून स्वतः चहाचा कप घेऊन आपल्या कारभारी मंडळीपुढे धरणारे शाहू महाराज वेगळेच. राजाने हॉटेल काढून दिले म्हणून आयुष्यभर ते चालवत न बसता शाहू विचाराच्या प्रसारासाठी आयुष्य खर्ची घालण्याचा निर्णय घेणारे गंगाराम कांबळे यांच्यासारखे सर्वसामान्य व्यक्तिमत्व पुढे पत्रकार, संपादक शाहू चळवळीचे नेते बनले. ही शाहू महाराजांची पारख होती. ती आंबेडकरांपासून भास्करराव जाधव, पी. सी. पाटलांपर्यंत अनेकांबाबत दिसली. स्वतःला शेतकरीच म्हणणारा, कुटुंबातील मुलीचा विवाह धनगर परिवारात करुन जातिभेदाच्या भिंती पाडणारा असा हा लोकोत्तर महापुरुष! बहुजनांची मानसिक गुलामी नष्ट करणारे, वर्णवर्चस्वा पेक्षा प्रत्येकाला माणसासारखे जगण्याचे समान हक्क मिळू देणारे, संस्थानाची सगळी संपत्ती पणाला लावून राधानगरी सारखे धरण बांधण्याची हिंमत दाखवणारे शाहू महाराजच. कोल्हापूर संस्थानात उद्यमशीलता वाढीस लागण्यास आणि सर्वसामान्य माणसांना उद्योगपती बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. त्यांच्या संस्थानात येणारा बेळगाव ग्रामीण वा कोल्हापूर जिह्याचा भाग, विकासावर प्रगतीवर आणि वैचारिक प्रगल्भतेवर ठसा आहे तो शाहू विचारांचा. म. फुले, डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे यांच्यापासून टिळकांपर्यंत सर्वांच्या कार्याला शाहू महाराजानी कृतिशील हातभार लावला. बालगंधर्व, केशवराव भोसले यांच्यासह असंख्यांच्या कलेला उत्तेजन दिले. कर्तबगाराला ती गाजवण्याची संधी मिळावी, अंगातील कसबाचा उपयोग जाणावा तो शाहू महाराजांनीच. म्हणूनच समाजात ज्याला किंमत नव्हती अशा भटक्मयांना चित्तेवान, कुत्तेवान, माहूत, पक्षी सांभाळणारे आणि प्रशिक्षण देणारे घडवण्याचे कार्य केले ते त्यांनीच. शिकार, मल्लविद्या, संगीत, नाटक, चित्रपट व चित्रकला यांना प्रोत्साहन देऊन कोल्हापूरचे कलापूर होण्यासाठीची वातावरणनिर्मिती त्यांच्या काळातच झाली. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून शिकून पुढे आलेले यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतराव दादा पाटील, क्रांती अग्रणी जी डी लाड, नागनाथअण्णा नायकवडी अशा अनेकांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले. ज्या ब्रिटिशांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहिताना त्यांना लुटारु म्हटले त्यांचाच राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्सच्या हातून पुण्यात छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा उभा करून त्याला शिवरायापुढे मान तुकवायला लावली. मांडलिक राजा म्हणून असलेल्या मर्यादेतही अद्वितीय कामगिरी केली. परदेशात शिक्षण झालेला हा राजा आयुष्यभर कोल्हापूरच्या रांगडय़ा माणसांशी रांगडय़ा भाषेतच बोलत राहिला. सामान्य गरीब माणसाला, पैलवानाला आपल्याबरोबर राजाच्या बग्गीत बसवून सरदारांच्या पोरांबरोबरीने वागवले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या सामाजिक महत्त्वाच्या पाच कायद्यांना लक्षात घेतले तर काळाच्या पुढे शंभर वर्षे हा राज्यकर्ता कसा होता त्याची चुणूक दिसते. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह आणि नोंदणी पद्धतीस मान्यता देणारा कायदा, स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा, विविध जाती धर्मियांसाठी कोल्हापूरचा काडीमोड कायदा, हिंदू अनौरस संतती आणि जोगतीणी संबंधीचा कायदा हे पाच कायदे त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांचे जाहीरनामेही कौतुकास्पद होते. गुरांच्या दवाखान्यात गरिबांच्या आजारी जनावरांना मोफत चारा, शेतकऱयाचा हात सापडणार नाही असा सुधारित उसाचा घाणा बनवणाऱयास बक्षीस, संस्थानातील उत्तम प्रगती करणाऱया मुलांना सरकारी अधिकारी पद देणे, प्लेगचा प्रसार रोखण्यासाठी गरिबांना गावाबाहेर झोपडय़ा आणि व्यापाऱयांनाही गाव सोडण्यासाठी प्रोत्साहन, घर सोडणाऱयांची मालमत्ता सरकारी खजिन्यात ठेवून पावती नुसार परत देणे, दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलसिंचन धोरण, मागास वर्गाला 50 टक्के आरक्षण, अठरा वर्षाच्या स्त्रीला सज्ञान मानणारा हुकूम, जातीय वितुष्टातून रायबाग सोडून गेलेल्या हिंदू-मुस्लीम कोष्टी कारागिरांचे तेथेच पुनर्वसन, संरक्षण आणि भांडवल देणे, कोल्हापूर बाहेर असलेल्या कुंभार, लोणारी, ढोर आणि कोरवी लोकांना वसाहत व व्यवसायासाठी जमीन, सफाई कामगारांना वृध्दापकाळ फंड, त्यावर देणी न चढवण्याचा आदेश, शैक्षणिक दर्जा वाढीस शिक्षकांना प्रशिक्षण अशा शेकडो आदेशातून त्यांच्या कारभाराचे दर्शन घडते. सर्वसामान्यांसाठी एका राज्यकर्त्याने आपले आयुष्य वेचले तर त्याच्या राज्याच्या शेकडो पिढय़ा प्रगती साधतात याचे शाहू महाराज एक उत्तम उदाहरण. म्हणूनच या लोकराजाच्या ऋणात भारत सदैव राहील.


previous post
next post