एफआयएच पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था /भुवनेश्वर
आगामी पुरुष गटातील एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान भारताचा इंग्लंड, स्पेन, वेल्स संघासह ड गटात समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत भुवनेश्वर व राऊरकेला येथे खेळवली जाणार आहे.
गुरुवारी 16 संघांचा ड्रॉ काढण्यात आला. 4 संघांचे 4 गट केले गेले असून प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धा दि. 13 ते 29 जानेवारी या कालावधीत होईल. यजमान भारत हा ड गटातील सर्वोच्च मानांकित संघ आहे. सध्या जागतिक मानांकन यादीत भारत पाचव्या स्थानी विराजमान आहे. भारताची लढत सहाव्या मानांकित इंग्लंडविरुद्ध होईल. अलीकडेच बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतही हे दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते. त्याशिवाय, दोनवेळचे रौप्यजेते स्पेन व वेल्सविरुद्ध भारताच्या अन्य दोन लढती होतील.
सध्या जागतिक मानांकन यादीत स्पेनचा संघ आठव्या स्थानी तर वेल्सचा संघ 16 व्या स्थानी आहे. वेल्ससाठी ही पहिलीवहिली विश्वचषक स्पर्धा आहे. अ गटात जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित ऑस्ट्रेलियाचा समावेश असून त्यांनी 2018 विश्वचषक स्पर्धेत कांस्य जिंकले होते. अ गटात त्यांच्यासह 2016 ऑलिम्पिक चॅम्पियन्स अर्जेन्टिना, फ्रान्स व आफ्रिकन चॅम्पियन्स दक्षिण आफ्रिका समाविष्ट आहेत.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन्स बेल्जियम अव्वलमानांकित असून त्यांचा 2006 चे विजेते जर्मनी, कोरिया व जपानसह ब गटात समावेश आहे. बेल्जियमचा संघ द्वितीय मानांकित तर जर्मनीचा संघ चतुर्थ मानांकित आहे.
क गटात मागील आवृत्तीतील फायनलिस्ट व जागतिक मानांकनातील तृतीय मानांकित नेदरलँड्स, ओशिनिया प्रतिनिधी न्यूझीलंड, मलेशिया व पदार्पणवीर चिलीचा समावेश असेल. यापैकी मलेशियासाठी यंदा ही नववी वर्ल्डकप स्पर्धा असेल. ड्रॉमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड्स यांचा पहिल्या स्तरात ड्रॉ काढण्यात आला. दि. 1 जून रोजी जाहीर एफआयएच विश्व मानांकनानुसार ही आखणी करण्यात आली.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, एफआयएच हंगामी अध्यक्ष सैफ अहमद, राज्य क्रीडामंत्री तुषारकांती बेहेरा, प्रशासक समितीचे सदस्य एस. वाय. कुरेशी, झफर इक्बाल याप्रसंगी उपस्थित होते.