Tarun Bharat

कुठल्याही आव्हानाकरता भारत सज्ज

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य  ः चीनसोबतच्या तणावाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था / सियांग

अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पहिल्यांदाच राज्याच्या दौऱयावर आहेत.  सियांगमध्ये मंगळवारी बोलताना राजनाथ सिंह यांनी भारत युद्ध इच्छित नाही, परंतु युद्ध लादण्यात आल्यास आम्ही कुठल्याही आव्हानाला आणि स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत असे उद्गार काढले आहेत. सीमेवर शत्रूच्या आव्हानांना हाणून पाडण्याची पूर्ण क्षमता भारताकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीआरओकडून निर्माण करण्यात आलेल्या सियोम पूलाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले आहे.

भारत कधीच युद्धज्वराला बळ देत नाही. आम्ही नेहमीच आमच्या शेजाऱयांसोबत सौहार्दाचे संबंध राखू इच्छितो. यासंबंधीचा वारसा आम्हाला भगवान राम आणि बुद्धांकडून मिळाला आहे. परंतु जर कुणी आगळीक केली तर आम्ही कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहोत असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘ही युद्धाची वेळ नाही’ या संकल्पाचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे. आमचा युद्धावर विश्वास नाही, परंतु आमच्यावर युद्ध लादले गेल्यास आम्ही कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहोत असे राजनाथ यांनी नमूद केले आहे.

बीआरओचे केले कौतुक

संरक्षणमंत्र्यांनी बीआरओकडून निर्मित 27 पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत सियोम पूलाचे उद्घाटन केले आहे. पूलाचे उद्घाटन केल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आम्ही येथे कुणालाच संदेश देऊ इच्छित नाही. एक मोठा कार्यक्रम असल्यानेच इथे आलो आहे. बीआरओ (सीमा रस्ते संघटना) आणि ‘ब्रो’वरून माझा गोंधळ व्हायचा. परंतु बीआरओ करत असलेले काम पाहून खरोखरच ही संघटना सुरक्षा दलांच्या भावासारखी आहे. पर्वतीय भागात बीआरओ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार राजनाथ यांनी काढले आहेत.

28 प्रकल्प राष्ट्राला समर्पित

 सैन्यसज्जता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागांमधील पूल तसेच रस्त्यांसह 28 पायाभूत प्रकल्पांना संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्राला समर्पित केले आहे. 724 कोटी रुपये खर्चून अरुणाचल प्रदेशच्या अलोंग-यिंकिओनग मार्गावर निर्माण करण्यात आलेल्या सियोम पूलाचा यात समावेश आहे. तर 28 प्रकल्पांमध्ये सियोम पूल, तीन रस्ते आणि तीन अन्य प्रकल्पांसह 22 पूल सामील आहेत. यातील 8 प्रकल्प लडाखमध्ये, 5 अरुणाचल प्रदेशात, 4 जम्मू-काश्मीरमध्ये, प्रत्येकी तीन सिक्कीम, पंजाब आणि उत्तराखंडमधील आहेत. तर राजस्थानातील दोन प्रकल्प बीआरओने पूर्ण केले आहेत.

जवानांसाठी प्रशंसोद्गार

तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमच्या शूर जवानांनी अत्यंत निर्धाराने शत्रूचा सामना केला. या क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे पुरेशा प्रमाणात असल्याने जवानांना मदतच झाली आहे. यामुळे दुर्गम भागांमध्ये काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राष्ट्र सशक्त ठेवणे आवश्यक

रस्ते अन् पूलाची निर्मिती याबद्दल ऐकल्यावर ती अत्यंत साधारण गोष्ट वाटते, परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी कुठल्याही रस्त्याच्या सुविधेशिवाय स्वतःचे आयुष्य काढले आहे, त्यांच्यासाठी हा विकास अत्यंत मोठी बाब आहे. बदलते जग, बदलता काळ आणि राष्ट्रांचे बदलणारे हितसंबंध पाहता कुठल्याही देशाने स्वत।ला सशक्त ठेवणे एक मोठी आवश्यकता आहे. जगात प्रतिदिन कुठल्या-न-कुठल्या प्रकारच्या संघर्षाची स्थिती दिसून येत राहते. परंतु भारत नेहमीच युद्धाच्या विरोधात राहिला असून हेच आमचे धोरण असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.

Related Stories

भारतातील यंदाचा मान्सून सामान्य राहणार – IMD

Archana Banage

पूजेचे स्वरुप आम्ही ठरवू शकत नाही!

Patil_p

गाझियाबाद : घरी पाहुणे आल्यास 11 हजार दंड

Tousif Mujawar

‘सप’ची सहानुभूती दहशतवाद्यांसोबत

Patil_p

‘रेमडेसिविर’च्या दरात मोठी कपात

Patil_p

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार

Patil_p