सामनावीर सूर्यकुमारचे अर्धशतक, विंडीजवर 7 गडय़ांनी मात, मेयर्सचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ बॅसेटेरे, सेंट किट्स-नेव्हिस
सूर्यकुमार यादवने पॉवर हिटिंगचे अप्रतिम प्रदर्शन केल्यामुळे भारताने येथे झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात यजमान विंडीजचा 7 गडय़ांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. यानंतरचे दोन सामने अमेरिकेतील लॉडरहिल येथे होणार आहेत.
येथील वॉर्नर पार्क मैदानावर आजवर झालेल्या टी-20 सामन्यात 147 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणे एकाही संघाला जमले नव्हते. मात्र सूर्यकुमार यादवने ही परंपरा खंडित करीत भारताला 165 धावांचे लक्ष्य 19 षटकांतच गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 44 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह 76 धावा झोडपल्या. श्रेयस अय्यरकडून त्याला बऱयापैकी साथ मिळाली. या दोघांनी 86 धावांची भागीदारी केल्याने भारताचा विजय सोपा झाला. पहिल्या सत्रात विंडीजने फलंदाजी केली तेव्हा खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल नसल्याचे दिसून आले होते. पण यादव व अय्यर यांनी त्यावरही उत्तम फटकेबाजी केली. नॉटिंगहॅममध्ये शतकी खेळी केल्यानंतरच्या काही सामन्यात तो अपयशी ठरला होता. त्याची भरपाई त्याने येथे केली. त्याने अल्झारी जोसेफला एक्स्ट्राकव्हर क्षेत्रात मारलेला लोफ्टेड षटकार अप्रतिम होता.
पाठीचे स्नायू दुखावल्याने सलामीवीर रोहित शर्मा (11) निवृत्त झाला होता. तरीही डावाच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत भारताने बिनबाद 96 धावांची मजल मारली होती. यादव बाद झाला तेव्हा भारताने 135 धावा जमविल्या होत्या. नंतर विजयाचे सोपस्कार रिषभ पंतने दीपक हुडाच्या साथीने 19 षटकांत पूर्ण केले. त्याआधी हार्दिक पंडय़ा 4 धावांवर बाद झाला होता. पंतने 26 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 33 धावा काढल्या. विंडीजच्या ड्रेक्स, होल्डर, अकील हुसेन यांनी एकेक बळी मिळविले.
मेयर्सचे अर्धशतक
तत्पूर्वी, विंडीजला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर किंग व मेयर्स यांनी 57 धावांची सलामी दिली. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर बऱयापैकी अंकुश ठेवला होता. पण युवा गोलंदाज अवेश खान व अर्शदीप सिंगवर त्यांनी हल्ला करीत संघाला 5 बाद 164 धावांची मजल मारून दिली. काईल मेयर्सने 50 चेंडूत 73 धावा फटकावताना 8 चौकार, 4 षटकार मारले. कर्णधार पूरनसमवेत त्याने 7.2 षटकांत 50 धावांची भर घातली. पूरनने 23 चेंडूत 22 धावा जमविल्या.
अवेश खान महागडा ठरला असला तरी दिनेश कार्तिकला फिनिशरची भूमिका दिली जाते, तसे अर्शदीप सिंगला त्याच्या वाईड यॉर्कर्स टाकण्याच्या कौशल्यामुळे डेथओव्हर्स स्पेशालिस्ट बनविण्याची तयारी केली जात आहे. मात्र त्याला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. त्याने 4 षटकांत 1 बळी मिळविताना 33 धावा दिल्या, त्यातील शेवटच्या दोन षटकांत त्याने 27 धावा दिल्या. शिमरॉन हेतमेयर (12 चेंडूत 20), रोव्हमन पॉवेल (14 चेंडूत 23) यांनी त्याच्यावर अखेरच्या टप्प्यात आक्रमण केले. हार्दिकने मात्र अचूक मारा करीत फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्याने 4 षटकात फक्त 19 धावा देत किंगचा बळी मिळविला. त्यात त्याचे 12 निर्धाव चेंडू होते. मधल्या षटकांत आर. अश्विननेही प्रभावी मारा केला. त्याने 26 धावा दिल्या. नव्या चेंडूवर दीपक हुडाला एक षटक देण्यात आले. त्याने त्यात केवळ 1 धाव दिली तर भुवनेश्वर कुमारने 35 धावांत 2 बळी टिपले. त्याने पूरन व मेयर्स यांचे बळी मिळविले.
या मालिकेतील चौथा व पाचवा सामना अमेरिकेतील लॉडरहिल येथे 6 व 7 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 20 षटकांत 5 बाद 164 ः किंग 20, मेयर्स 70 (50 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), पूरन 22 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पॉवेल 23 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), हेतमेयर 20 (12 चेंडूत 2 षटकार), अवांतर 5. गोलंदाजी ः भुवनेश्वर 2-35, हार्दिक 1-19, अर्शदीप 1-33, अवेश खान 0-47.
भारत 19 षटकांत 3 बाद 165 ः रोहित शर्मा 11 (जखमी निवृत्त), सूर्यकुमार यादव 76 (44 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), अय्यर 24 (27 चेंडूत 2 चौकार), पंत नाबाद 33 (26 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), हादिंक 4, हुडा नाबाद 10 (7 चेंडूत 1 चौकार), गोलंदाजी ः ड्रेक्स 1-33, होल्डर 1-30, अकील हुसेन 1-28.