सामनावीर सूर्यकुमारची फटकेबाजी, राहुलचे दुसरे अर्धशतक, अश्विनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
क्रिकेटच्या अतिझटपट प्रकारातील जादुगार असा लौकीक मिळविणाऱया सूर्यकुमार यादवचे आणखी एक तुफानी अर्धशतक व केएल राहुलचे सलग दुसरे अर्धशतक व भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारताने सुपर 12 फेरीतील झिम्बाब्वेविरुद्ध 71 धावांनी दणदणीत विजय मिळवित टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात द.आफ्रिकेचा धक्कादायक पराभव झाल्यानंतरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले होते. सूर्यकुमारला सामनावीराचा बहुमान मिळाला.
भारताची उपांत्य लढत गट एकमध्ये दुसरे स्थान मिळविणाऱया इंग्लंडविरुद्ध गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी होईल तर त्याआधी बुधवारी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात पहिली उपांत्य लढत होईल.
या विश्वचषक स्पर्धेत सूर्याने कोहलीच्या तोडीस तोड खेळ केला असून त्याने या डावात केवळ 25 चेंडूतच नाबाद 61 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय सलामीवीर केएल राहुलने या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक नोंदवताना 35 चेंडूत 51 धावा फटकावल्या तर कोहलीने 25 चेंडूत 26 धावांचे योगदान दिल्यानंतर भारताने 20 षटकांत 5 बाद 186 अशी भक्कम धावसंख्या उभारली. हे आव्हान पेलवण्याइतकी फलंदाजीची खोली झिम्बाब्वेच्या बॅटिंग लाईनअपमध्ये नसल्याने आर.अश्विन व त्याच्या सहकाऱयांच्या भेदक माऱयापुढे त्यांचा डाव 17.2 षटकांत 117 धावांत गुंडाळत भारताने एकतर्फी विजय मिळविला. राहुलने अर्धशतकी खेळी करताना कोहलीसमवेत दुसऱया गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी केली. अश्विनने आपल्या ऑफस्पिनवर 22 धावांत 3 बळी टिपले. अक्षर पटेल वगळता अन्य गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली. हार्दिक पंडय़ा व शमी यांनी प्रत्येकी 2 तर अर्शदीप व भुवनेश्वर यांनी एकेक बळी टिपला.
भारत अव्वल स्थानी
या विजयानंतर भारताने गट 2 मध्ये 5 पैकी 4 विजय मिळवित सर्वाधिक 8 गुण मिळवित पहिले स्थान मिळविले. पाक 6 गुणांसह दुसऱया व द.आफ्रिका 5 गुणांसह तिसऱया स्थानावर राहिले. भारत आता चौथ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे. यापूर्वी 2007, 2014, 2016 या वर्षी शेवटच्या चारमध्ये भारताने प्रवेश मिळविला होता. त्यापैकी 2007 मधील पहिल्या स्पर्धेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते.
23 ऑक्टोबर रोजी कोहलीने संस्मरणीय खेळी करीत एमसीजी मैदान गाजवले होते. याच मैदानात रविवारच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याची पुनरावृत्ती करीत जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने आक्रमक हल्ला करून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर बरेच दडपण आणत टी-20 मधील आपण नंबर वन फलंदाज असल्याचे दाखवून दिले. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने शेवटच्या 5 षटकांत तब्बल 79 धावा झोडपल्या. त्याने प्रत्येक फटक्यावर आपला दर्जा दाखवून दिला. शेवटच्या षटकात त्याने एन्गरेव्हाच्या ऑफस्टंपबाहेरील चेंडूला फाईनलेगच्या दिशेने फटकावले तर शेवटच्या चेंडूवर फाईनलेगला उत्तुंग षटकार ठोकला. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने केवळ 15 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्सने 2 तर एन्गरेव्हा, मुझरबानी, सिंकदर रझा यांनी एकेक बळी मिळविले. यापैकी रझा, वेलिंग्टन मासाकेझा, सीन विल्यम्स यांनी 7 ते 15 या षटकादरम्यान उत्तम मारा करीत भारतीय धावगतीवर अंकुश ठेवला होता. सूर्या व हार्दिक यांनी नंतर 30 चेंडूत 65 धावा तडकावत समीकरण बदलून टाकले. एन्गरेव्हा, मुझरबानी, तेंदाय चतारा यांनी आपल्या 12 षटकांत तब्बल 138 धावा दिल्या.
झिम्बाब्वेला हे आव्हान पेलवणारे नव्हतेच. फॉर्ममध्ये असलेला सिकंदर रझा व विल्यम्सकडून थोडाफार प्रतिकार होण्याची अपेक्षा होती. रझाने 24 चेंडूत 34, विल्यम्सने 11 व नंतर रेयान बर्लने 22 चेंडूत 35 धावा जमविल्या. पण त्यांना मोठे योगदान देता आले नाही. कर्णधार एर्विनही 13 धावा काढून बाद झाला. अश्विनने आपल्या फिरकीवर 3 बळी मिळविले तर शमी, हार्दिक यांनी प्रत्येकी 2 व भुवनेश्वर, अक्षर पटेल, अर्शदीप यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 5 बाद 186 ः केएल राहुल 51 (35 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), रोहित शर्मा 15 (13 चेंडूत 2 चौकार), कोहली 26 (25 चेंडूत 2 चौकार), सूर्यकुमार यादव नाबाद 61 (25 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), रिषभ पंत 3, हार्दिक पंडय़ा 18 (18 चेंडूत 2 चौकार), अक्षर नाबाद 0, अवांतर 12. गोलंदाजी ः सीन विल्यम्स 2-9, सिकंदर 1-18, मुझरबानी 1-50, एन्गरेव्हा 1-44.
झिम्बाब्वे 17.2 षटकांत सर्व बाद 117 ः पेग एर्विन 13 (15 चेंडूत 2 चौकार), विल्यम्स 11 (18 चेंडूत 1 षटकार), सिकंदर रझा 34 (24 चेंडूत 3 चौकार), रेयान बर्ल 35 (22 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), अवांतर 11. गांलंदाजी ः अश्विन 3-22, हार्दिक पंडय़ा 2-16, शमी 2-14, अर्शदीप 1-9, भुवनेश्वर 1-11, अक्षर पटेल 1-40.
पहिला उपांत्य सामना
बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी
न्यूझीलंड वि. पाकिस्तान स्थळ ः सिडनी, वेळ ः दु. 1.30 वा.