Tarun Bharat

भारताला आज विजयाची गरज

बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना आज, भारतीय फलंदाजी बहरण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था/ मिरपूर

पहिल्या वनडे सामन्यात यजमान बांगलादेशकडून मनोबल खचवणारा पराभव झाल्यानंतर भारताची अव्वल फलंदाजांची फळी त्यात बदल करण्यासाठी उत्सुक झाले असून स्पिनर्ससमोर चांगले प्रदर्शन करण्याच्या इराद्याने ते बुधवारी दुसऱया सामन्यासाठी मैदानात उतरतील. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. सकाळी 11.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे प्रक्षेपण होणार आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी समीप आला होता. पण बांगलादेशला 50 हून अधिक धावांची गरज असताना त्यांचा शेवटचा गडी बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले होते. यष्टिरक्षक केएल राहुलने मिराजला दिलेले जीवदानही भारतासाठी खूपच महाग ठरले होते. तरीही स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय खेळाडूंना अधिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. यापूर्वी 2015 मध्ये भारत व बांगलादेश यांच्यात द्विदेशीय मालिका झाली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बांगलादेशकडून 1-2 असा मालिका पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी पहिले दोन सामने बांगलादेशने तर शेवटचा सामना भारताने जिंकला होता.

शेर ए बांगला स्टेडियमवर स्पिनर्स शकीब हसन व मेहदी हसन मिराज यांनी 11 ते 40 व्या षटकांपर्यंत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांवर वर्चस्व ठेवले तर या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. या मधल्या षटकांतच केएल राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज झगडताना दिसले होते. विश्वचषक स्पर्धेसाठी अद्याप दहा महिन्यांचा अवधी असून भारतीय संघाचा ऍप्रोच काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निर्भय होऊन खेळण्याची चर्चा बराच काळ सुरू आहे. मात्र त्याची क्वचितच अंमलबजावणी होताना दिसते. काही वेळा परिस्थितीशी जुळवून घेता येणे जास्त महत्त्वाचे ठरते. मिरपूरमधील खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल नव्हती, हे खरे असले तरी त्यावर फक्त 186 धावा होणे अपेक्षित नव्हते.

शुबमन गिल व संजू सॅमसन यांना या मालिकेतून वगळण्याचा निवड समितीचा निर्णयही चकित करणारा आहे. न्यूझीलंडचा छोटा दौरा असल्याने त्यांची निवड न करता नव्यांना संधी दिल्याचे स्पष्टीकरण त्यावेळच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दिले होते. गिलला टी-20 वर्ल्ड कप व त्यानंतरच्या टी-20 मालिकेत वगळण्याचा निर्णयही आश्चर्यकारक होता.

भारताच्या आघाडीचे फलंदाज जलदगतीने धावा बनवताहेत, पण अपेक्षेहून जास्त डॉट बॉल्सही खेळत असून ही त्यांची मुख्य समस्या बनली आहे. पहिल्या सामन्यात भारताने 42 षटकेच खेळ केला, त्यातही 25 षटकाहून अधिक डॉट बॉल्स खेळले. न खेळलेल्या आठ षटकांचा विचार केल्यास भारताने तब्बल 200 चेंडू वाया घालवले असेच म्हणावे लागेल. इंग्लंडसारखा संघ आपल्या ऍप्रोचमध्ये आमूलाग्र बदल करीत असताना भारताने एक पाऊल पुढे टाकले तर चार पावले मागे घेतली आहेत, असे दिसून येते.

राहुलवर यष्टिरक्षणाची जबाबदारी देत लवचिकता वाढविणे हा हेतू नसून, वर्ल्ड कपच्या अंतिम संघात धवन व राहुल यांना सामावून घेण्यासाठी केलेली ती चाल आहे. रजत पाटीदार व राहुल त्रिपाठी यांना अल्पशी संधी देण्यात आली, मात्र ते प्रवासीच राहिले आहेत. त्यामुळे त्यांची चाचणी संघव्यवस्थापन कशी घेणार, हा प्रश्नच आहे. प्रशिक्षक द्रविड व कर्णधार रोहित यांनी अजून कठोर निर्णय घेतलेले नाहीत आणि ते लवकर घेतील, असेही दिसत नाही. बांगलादेशचा मात्र पहिल्या सामन्यातील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेला असून या सामन्यातच मालिकेचा निकाल लावण्यास ते उत्सुक झाले आहेत.

संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, धवन, कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, दीपक चहर, सिराज, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार.

बांगलादेश ः लिटॉन दास (कर्णधार), अनामुल हक, शकीब हसन, मुश्फिकूर रहीम, अफिफ हुसेन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजूर रहमान, नसुम अहमद, मेहमूदुल्लाह, नजमुल हुसेन शांतो, काझी नुरुल हसन सोहन, शोरिफुल इस्लाम.

सामन्याची वेळ ः सकाळी 11.30 पासून

थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.

Related Stories

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

Patil_p

40 वर्षांनंतर ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत!

Patil_p

भारतीय महिला सॉफ्टबॉल संघाचे आशियाई स्पर्धेत पदार्पण

Patil_p

आयपीएल लिलाव 16 डिसेंबरला

Amit Kulkarni

एटीपी क्रमवारीत व्हेरेव्ह चौथ्या स्थानावर

Patil_p

विजयाच्या मोहिमेसाठी आज ईस्ट बंगालची लढत नॉर्थईस्टशी

Patil_p