युक्रेनियन शरणार्थींना अन्य मार्गाने पाठविणार मदत
जपानच्या सैन्य विमानांद्वारे युक्रेनच्या शरणार्थींना भारताच्या मार्गाने मदत पाठविण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळल्यावर आता जपानने नवी योजना आखली आहे. जपानी सैन्याची विमाने आता भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातमध्ये सामग्री लोड करतील. या विमानांद्वारे युक्रेनच्या शरणार्थींना मदत पाठविली जाणार आहे. एप्रिल अखेरऐवजी आता मे महिन्यात ही सामग्री जपानला पाठविता येणार आहे.
जपानची वाहतूक विमाने केवळ संयुक्त अरब अमिरातमध्ये सामग्री लोड करतील. तर यापूर्वी हे भारतात केले जाणार होते. भारताने या विमानांनी उतरण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. जपानचा हा पुरवठा मेपासून सुरू होत आता जूनच्या अखेरपर्यंत चालणार आहे. दर आठवडय़ाला एक विमान पाठविण्याची योजना आहे. जपान ब्लँकेट आणि अन्य सामग्री स्वतःच्या सी2 वाहतूक विमानाद्वारे पोलंड तसेच रोमानियात नेणार आहे.
पोलंड आणि रोमानियामध्ये सर्वाधिक शरणार्थी पोहोचले आहेत. शरणार्थींकरता संयुक्त राष्ट्रसंघ उच्चायुक्तांच्या आवाहनानुसार मानवी आंतरराष्ट्रीय सहाय्य कार्यक्रमाच्या अंतर्गत हा पुरवठा करत असल्याचे जपानचे म्हणणे आहे. युएईऐवजी भारताच्या मार्गे ही सामग्री नेण्याची जपानची योजना होती.
भारतासोबत कार्यकारी स्तरावर करार झाला होता, परंतु अचानकपणे भारत सरकारने याला अनुमती नाकारल्याचा दावा जपानच्या अधिकाऱयांनी केला आहे. भारताचे रशियासोबत मैत्रिपूर्ण संबंध असून युक्रेन युद्धात भारत पूर्णपणे तटस्थ राहिला आहे. भारताने पाश्चिमात्य देशांकडून रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. भारत स्वतःच्या भूमीवरून जपानच्या सैन्य विमानांना युक्रेनसाठी सामग्री नेण्याची अनुमती देणार नसल्याचे विदेशमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सैन्य विमानांच्या जागी व्यावसायिक उड्डाणांना अनुमती दिली जाऊ शकते. जपानने मुंबईत सैन्य विमानांना लँड करण्याची अनुमती मागितली होती. जपान भारतातून युक्रेनला मानवी मदत पाठवू इच्छित होता. अशाप्रकारच्या पुरवठय़ाकरता व्यावसायिक विमानांना अनुमती देऊ शकतो असे जपानला कळविले होते असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. तर सैन्य विमानांद्वारे मदत पाठवून जपान रशियाला संदेश देऊ पाहत आहे.