आघाडी फळीच्या कामगिरीवर भारताचे लक्ष, न्यूझीलंडची मध्यफळीकडून अपेक्षा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारत व न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज बुधवारी येथे होत असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. आघाडीच्या युवा फलंदाजांवर या सामन्यात भारताचे जास्त लक्ष असणार आहे. सायंकाळी 7 वाजता सामन्याला प्रारंभ होत असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांच्या गैरहजेरीत संधी मिळालेल्या शुबमन गिल, इशान किशन व राहुल त्रिपाठी यांना पहिल्या दोन सामन्यात त्याचा उपयोग करून घेता आलेला नाही. बुधवारच्या या सामन्यानंतर भारतीय संघाला बराच काळ टी-20 सामने खेळावयास मिळणार नाहीत. त्यामुळे इशान, गिल व त्रिपाठी या तिघांना आपली क्षमता दाखविण्याची ही शेवटची संधी असेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका होणार असल्याने सर्वांचे लक्ष कसोटीवर लागणार आहे.
बांगलादेशविरुद्ध विक्रमी द्विशतक नोंदवल्यापासून इशान किशनला लयच सापडलेली नाही तर फिरकीसमोर गिल अडखळला आहे. वनडेमध्ये त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. मात्र अतिझटपट प्रकारात गिलला तो फॉर्म दाखविता आलेला नाही. कोहलीच्या जागी तिसऱया क्रमांकावर खेळणाऱया राहुल त्रिपाठीने मिळालेल्या संधी वाया घालविल्या आहेत. सूर्यकुमार यादव व कर्णधार हार्दिक पंडय़ाने समयोचित फलंदाजी केल्यामुळेच रविवारी भारताला 100 धावांचे माफक आव्हान गाठण्यात यश आले. या मालिकेतील खेळपट्टय़ांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर दोन्ही संघातील खेळाडू फिरकीस कसे सामोरे जातात, हे पहावे लागेल.
गोलंदाजीच्या विभागात चहल व कुलदीप यादव दोघांना एकत्र खेळविल्याने भारताला प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्यात यश मिळाले. दुसऱया सामन्याची खेळपट्टी फिरकीस अनुकूल असूनही चहलला केवळ दोनच षटके गोलंदाजी दिली गेली, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. नोबॉलच्या समस्येवर मात करून अर्शदीप सिंगनेही लखनौमध्ये शानदार प्रदर्शन करीत दोन बळी मिळविले. यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला असून या निर्णायक सामन्यात तो न्यूझीलंडसाठी घातक ठरू शकतो. मालिकेचा निर्णय निश्चित करणारा सामना असल्याने पृथ्वी शॉ चा समावेश करण्याची मागणी होत असली तरी कर्णधार हार्दिक पंडय़ा संघात कोणताही बदल करण्यास तयार होणार नाही. पृथ्वी शॉने बऱयाच कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे.
न्यूझीलंड संघ मात्र मध्यफळीकडून अधिक अपेक्षा करीत आहे. न्यूझीलंडला मालिका जिंकण्याची दुर्मीळ संधी मिळणार असल्याने हे आव्हान स्वीकरण्यास ते प्रेरित झाले आहेत. ग्लेन फिलिप्स हा त्यांचा घातक फलंदाज आहे. पण पहिल्या दोन सामन्यात त्याला अपेक्षित चमक दाखविता आली नाही. यावेळी त्याची तो निश्चितच भरपाई करेल, अशी अपेक्षा आहे. वनडे मालिकेत सनसनाटी निर्माण करणारा मायकेल ब्रेसवेलही मोठी खेळी करण्याच्या मार्गावर आहे. तिसऱया क्रमांकावरील मार्क चॅपमनही भरीव योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने तब्बल आठ गोलंदाजांचा वापर केला. त्यापैकी चार स्पिनर्सनी आपला चार षटकांचा कोटा पूर्ण केला. दोन वर्षापूर्वी येथे झालेल्या सामन्यात 200 हून अधिक धावा जमविल्या गेल्या होत्या. त्यामुळे लखनौतील काहीशा मिळमिळीत सामन्यानंतर चाहत्यांना धावांची आतषबाजी पाहणे निश्चितच आवडेल.
संभाव्य संघ ः भारत ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
न्यूझीलंड ः सँटनर (कर्णधार), ऍलन, मायकेल ब्रेसवेल, चॅपमन, देव्हॉन कॉनवे, डेन क्लीव्हर, जेकब डफी, फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डॅरील मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपॉन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
तेंडुलकर, बीसीसीआय विजेत्या यू-19 महिला संघाचा सत्कार करणार
नुकत्याच झालेल्या यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी जेतेपद पटकावत नवा इतिहास निर्माण केला. या विजेत्या संघाचा माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकर व बीसीसीआय गौरव करणार असल्याचे सचिव जय शहा यांनी सोमवारीच जाहीर केले होते. भारत-न्यूझीलंड सामन्याआधी सायंकाळी 6.30 वाजता या संघाचा गौरव करण्यात येणार असून बीसीसीआयचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.