Tarun Bharat

भारत-न्यूझीलंड शेवटची वनडे लढत आज

मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला विजय आवश्यक, पेसर्ससमोर फलंदाजांची परीक्षा

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

बेभरवशाच्या वातावरणामुळे हताश, निराश झालेला भारतीय संघ बुधवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध होणारा शेवटचा वनडे सामना तरी पावसाचा कोणताही अडथळा न येता पूर्ण होईल, अशी आशा करीत आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याचे प्रक्षेपण दूरदर्शनवरून (डीडी स्पोर्ट्स) होणार आहे.

ख्राईस्टचर्चमध्ये बुधवारीही तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजामुळे भारतीय खेळाडू निराश होणे साहजिक आहे. या मालिकेत भविष्यातील खेळाडूंची चाचणी होत आहे. मात्र लहरी हवामानामुळे त्यांना आपली क्षमता दाखविण्याची फारशी संधीच मिळालेली नाही. व्हाईटबॉल क्रिकेटच्या पाचपैकी दोन सामन्यांचे (1 टी-20 व 1 वनडे) निकाल लागू शकले नाहीत तर टी-20 चा एक सामना अर्धवट राहिला होता. पण डकवर्थ-लेविस नियमानुसार हा सामना टाय झाला होता. मालिका जिंकण्याची संधी भारताला अजिबात नाही. कारण पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला तर दुसरा सामना रद्द झाला होता. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक असून त्यासाठीच ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. हॅगले ओव्हलची खेळपट्टी नेहमी सीम गोलंदाजांना अनुकूल ठरणारी असते आणि गेल्या काही वर्षात 230 च्या आसपास त्यावर सरासरी धावसंख्या बनत आली आहे.

पहिल्या दहा षटकांच्या पॉवप्लेमधील भारताची फलंदाजी यावर बरीच चर्चा होत आली आहे. कर्णधार धवन हा वनडेमधील धडाकेबाज फलंदाज असला तरी पुढील वर्षीच्या विश्वचषक संघात स्थान मिळवायचे असल्यास ऍप्रोचमध्ये आमूलाग्र बदल करावा लागणार, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. त्याचा सलामीचा युवा जोडीदार शुबमन गिलने शॉट सिलेक्शनमध्ये अचूकता दाखवत दोन डावात 50 व नाबाद 45 धावा जमविल्या. सध्या बहरात असणाऱया सूर्यकुमार यादवने सेडॉन पार्कवरील 12.5 षटकांच्या खेळात 3 षटकार खेचत भारतीय प्रेक्षकांना खुष केले. पण गेल्या काही वनडेत स्विंग गोलंदाजीस मदत करणाऱया येथील खेळपट्टीवर न्यूझीलंडसमोर मोठी धावसंख्या उभारण्याचे भारतीय फलंदाजांसमोर मुख्य आव्हान असेल. यासाठी फक्त सलामीवीर व सूर्या यांनीच नव्हे तर रिषभ पंत व अन्य फलंदाजांना जबाबदारी घेत चमक दाखवण्याची गरज आहे.

पंतचे वनडे रेकॉर्ड चांगले असले तरी इंग्लंडच्या दौऱयापासून (विशेषतः टी-20 मध्ये) त्याचा फॉर्म हरवला असल्याने धावांसाठी त्याला झगडावे लागत आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या दर्जेदार आक्रमणासमोर मधली फळी मजबूत वाटण्यासाठी त्याला बहरणे आवश्यक आहे. पंतचे अस्तित्व व गोलंदाजी करू शकणाऱया फलंदाजांचा अभाव यामुळे संजू सॅमसनला पुन्हा एकदा संघाबाहेर रहावे लागण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात त्याच्या जागी अष्टपैलू दीपक हुडाला संधी देण्यात आली होती. मागील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे हंगामी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण अंतिम संघात काही बदल, विशेषतः गोलंदाजीत, करतात का हे पहावे लागेल. कुलदीप यादवला अजून संधी मिळालेली नाही, कदाचित त्याला या सामन्यात संधी मिळू शकेल. पण चहल किंवा वॉशिंग्टन सुंदरला वगळणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, असाही ते विचार करतील. ऑकलंडमधील पहिल्या वनडेत शार्दुल ठाकुर सामान्य गोलंदाज वाटला. त्यामुळे अर्शदीप, दीपक चहर व उमरान मलिक हेच या सामन्यातही वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील, अशी शक्यता आहे.

न्यूझीलंडचा विचार करता मॅट हेन्री, साऊदी, फर्ग्युसन या पेसर्सना उपयुक्त ठरणारी आदर्श खेळपट्टी समोर असल्याने ते याचा निश्चितच फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. पण भारतीय पेसर्सही लॅथम, विल्यम्सन, फिलिप्स यांची परीक्षा घेतील, हेही तितकेच खरे आहे.

संभाव्य संघ ः भारत ः धवन (कर्णधार), गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, पंत, सॅमसन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, चहल, दीपक चहर, अर्शदीप, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक.

न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), फिन ऍलेन, देव्हॉन कॉनवे, लॅथम, डॅरील मिचेल, फिलिप्स, ब्रेसवेल, साऊदी, हेन्री, ऍडम मिल्ने, नीशम, सँटनर, लॉकी फर्ग्युसन.

सामन्याची वेळ ः सकाळी 7 पासून

थेट प्रक्षेपण ः डीडी स्पोर्ट्स

लाईव्ह स्ट्रीमिंग ः अमेझॉन प्राईम व्हिडिओ.

Related Stories

बुद्धिबळ स्पर्धेत रोनक साधवानी विजेता

Amit Kulkarni

हैदराबादने दिल्लीचा 88 धावांनी फडशा पाडला!

Patil_p

आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Amit Kulkarni

नीरज चोप्रा, रोहित यादव अंतिम फेरीत

Amit Kulkarni

स्पेन, न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

साबरीकडे पहिले डब्ल्यूबीसी जेतेपद

Patil_p