वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियात रविवार 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक संघामध्ये होणाऱया सामन्याची तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या यांच्यातील सिडनीत होणारा सुपर 12 फेरीतील पहिला सामनाही ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे.
या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया भूषवित आहे. ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेतील विद्यमान विश्वविजेता आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा या स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडे राखण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील पहिला सामना 22 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट मैदानावर विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडबरोबर होणार आहे. या सामन्याची तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. आयसीसीच्या या स्पर्धेतील सामन्यांसाठी यापूर्वीच शौकिनांनी सुमारे 6 लाख तिकिटे खरेदी केली आहेत. 2021 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळविला गेला होता. आता शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी याच सामन्याची पुनरावृत्ती होत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी विविध देशांचे क्रिकेट शौकीन ऑस्ट्रेलियात दाखल होत आहेत. मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर ही लढत या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल. दोन महिन्यापूर्वी या सामन्याच्या तिकीट विक्रीला प्रारंभ करण्यात आला होता. केवळ 10 मिनिटातच सर्व तिकिटे खपली गेली. या स्टेडियममध्ये शौकिनांना उभे राहून सामना पाहण्याची सुविधा करण्यात आली असून त्यांच्यासाठी जादा तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
27 ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱया दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश तसेच भारत आणि अ गटातील उपविजेता यांच्यातील सामन्यांची तिकिटेही यापूर्वीच संपली आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळविल्या जाणाऱया सामन्याची काही मर्यादित तिकिटे शिल्लक असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले आहे.
16 ऑक्टोबर रोजी रविवारी या स्पर्धेतील सलामीचा सामना लंका आणि नामिबिया यांच्यात गिलाँग येथील कार्डिनिया पार्क स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. सदर स्पर्धेतील उर्वरित बऱयाच सामन्यांची तिकिटे अद्याप उपलब्ध आहेत. स्पर्धा आयोजकांनी या स्पर्धेसाठी दोन ते 16 वर्षे वयोगटातील मुलांकरिता तिकिटाचे दर माफक (प्रत्येक तिकिटाची किंमत 5 डॉलर्स) ठेवण्यात आली आहे. ही सुविधा स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सर्व सामन्यांसाठी तसेच सुपर 12 फेरीतील सामन्यांसाठी राहिल. प्रौढांसाठी तिकिटाचे दर 20 अमेरिकन डॉलर्सपासून ठेवण्यात आले आहेत. सदर स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद ऑस्ट्रेलियातील 7 शहरे भूषविणार आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान यांच्या सामन्यांना शौकिनांची गर्दी अधिक राहिल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.