संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दौऱयावर : 12 हायस्पीड बोट्स केल्या प्रदान
वृत्तसंस्था / हनोई
व्हिएतनामच्या तीन दिवसीय दौऱयावर गेलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी व्हिएतनामच्या नौदलाला 12 हायस्पीड बोट्स सोपविल्या आहेत. या नौकांची निर्मिती भारत सरकारच्या व्हिएतनामला प्रदान करण्यात आलेल्या 100 दशलक्ष डॉलर्सच्या डिफेन्स लाइन ऑफ क्रेडिट अंतर्गत करण्यात आली आहे.
व्हिएतनाम या नौकांचा वापर स्वतःच्या सागरी-सुरक्षेसाठी करणार आहे. भारताचा ज्याप्रकारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत वाद आहे, त्याचप्रकारे व्हिएतनामचा चीनसोबत सागरी सीमांवरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
व्हिएतनामला प्रदान करण्यात आलेल्या 5 नौकांची निर्मिती भारतात लार्सन अँड टुब्रो शिपयार्डमध्ये करण्यात आली. तर उर्वरित 7 नौका व्हिएतनामच्या होंग हा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. गुरुवारी नौकांचा हँडिंग-इन-सेरेमनी याच होंग हा शिपयार्डमध्ये पार पडला आहे. या सोहळय़ात भारत आणि व्हिएतनामचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हेते.
हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’चे जिवंत उदाहरण आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानानंतरही प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होणे भारतीय संरक्षण निर्मिती क्षेत्रासह होंग हा शिपयार्डची प्रतिबद्धता आणि व्यावसायिक कौशल्याचा पुरावा आहे. हा प्रकल्प भविष्यात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक अन्य सहकारी संरक्षण प्रकल्पांचा अग्रदूत ठरणार असल्याचा विश्वास राजनाथ सिंह यांनी स्वतःच्या संबोधनात व्यक्त केला आहे.
भारतीय संरक्षण उद्योगाने पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत स्वतःच्या क्षमतांमध्ये मोठी वृद्धी केली आहे. भारताला संरक्षण निर्मिती केंद्र करण्यासह एक देशांतर्गत उद्योग निर्माण करत देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय आवश्यकता पूर्ण करणे हा याचा उद्देश असल्याचे राजनाथ म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे व्हिएतनामच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱयावर गेले आहेत. हनोईमध्ये 8 जून रोजी राजनाथ यांनी व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल फान वान जियांग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी 2030 पर्यंतच्या व्हिजन दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे.