Tarun Bharat

भारत-द. आफ्रिका तिसरी टी-20 लढत आज

Advertisements

भारत-द. आफ्रिका तिसरी टी-20 लढत आज : भारताने मालिका यापूर्वीच जिंकली असल्याने औपचारिक लढत, काही नवे प्रयोग राबवण्याची संधी, भारतासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी शेवटचा सामना

वृत्तसंस्था / इंदोर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी व शेवटची औपचारिक टी-20 आज (मंगळवार दि. 4) खेळवली जाणार असून भारताने ही मालिका यापूर्वीच जिंकली असल्याने या लढतीत काही प्रयोग राबवण्याची संधी असेल. ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपपूर्वी भारतासाठी ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 लढत असणार आहे. सामन्याला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

गतवर्षी संपन्न झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताला लवकरच गाशा गुंडाळावा लागला होता. पण, त्यानंतर वर्षभरात बरेच चित्र बदलले असून सध्या संघ उत्तम बहरात दिसून आला आहे. केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली या ‘टॉप थ्री’ फलंदाजांनी आपला क्लास दाखवून दिला असल्याने ही देखील भारतासाठी जमेची बाजू असणार आहे.

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज सूर्यकुमार यादव सर्वोत्तम बहरात असून वर्ल्डकपमध्येही तो याच क्रमांकावर खेळू शकेल. सूर्यकुमारला आज विश्रांती देण्यात आल्यास येथे श्रेयस अय्यरचा पर्याय हाताशी असेल. रिषभ पंतला या मालिकेत अद्याप फलंदाजीची संधी मिळालेली नाही तर दिनेश कार्तिकला दुसऱया टी-20 सामन्यात केवळ 7 चेंडू खेळण्याची संधी मिळाली.

जसप्रित बुमराहच्या गैरहजेरीमुळे गोलंदाजी लाईनअपला खिंडार पडले असून डेथ ओव्हर्सची जबाबदारी कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूत समाविष्ट दीपक चहर नव्या चेंडूवर उत्तम मारा करण्यात यशस्वी ठरत आला आहे. पण, डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखण्यात त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही.

डावखुऱया अर्शदीपने नव्या व जुन्या चेंडूंवर उत्तम मारा केला. पण, रविवारी तो महागडा ठरला. अश्विनला या मालिकेत अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही. बुमराहच्या गैरहजेरीत सिराजला संधी मिळेल, असे संकेत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

@भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

@दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, बियॉर्न फॉर्च्युइन, रिझा हेन्ड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, मार्को जान्सन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पार्नेल, अँदिले फेहलुकवायो, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, रिली रॉस्यू, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज.

सामन्याची वेळ : सायं. 7 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

विराट टी-20 इतिहासात : 11 हजार धावा जमवणारा पहिला भारतीय

फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ विराट कोहली टी-20 इतिहासात 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला. विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 3712 धावा केल्या असून याशिवाय, दिल्ली, भारत, इंडियन्स व आरसीबी या संघांकडून एकत्रित धावांच्या निकषावर त्याने 11 हजार धावांचा टप्पा सर केला आहे. द. आफ्रिकेविरुद्ध 19 धावा केल्या, त्यावेळी त्याने हा टप्पा सर केला. सर्वात जलद हा माईलस्टोन गाठण्याचा विक्रमही त्याच्या खात्यावर नोंद झाला. त्याने केवळ 354 डावात हा पराक्रम गाजवला.

टी-20 मध्ये कॅलेंडर वर्षात 50 षटकार फटकावणारा

सूर्यकुमार यादव पहिला फलंदाज

भारताचा अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेट प्रकारात कॅलेंडर वर्षात 50 षटकार खेचणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात हा माईलस्टोन सर केला. त्याच्या अवघ्या 22 चेंडूतील 61 धावांच्या खेळीत 5 चौकार व 5 टोलेजंग षटकारांचा समावेश राहिला.

विराट कोहली, केएल राहुलला शेवटच्या टी-20 सामन्यातून विश्रांती

स्टार फलंदाज विराट कोहली तसेच केएल राहुल यांना द. आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. रविवारी दुसऱया लढतीत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कोहली सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाला. आता भारतीय संघ दि. 6 ऑक्टोबर रोजी टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, त्यावेळी विराट पथकात दाखल होणे अपेक्षित आहे.

यापूर्वी, रविवारी झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात भारताने 16 धावांनी विजय संपादन केला, त्यात माजी कर्णधार विराटने 28 चेंडूत नाबाद 49 धावांची आतषबाजी केली होती. यापूर्वी, विंडीजविरुद्ध वनडे व टी-20 मालिकेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली, त्यावेळी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. विराटने त्यावेळी महिनाभराचा ब्रेक घेतला आणि या कालावधीत बॅटला अगदी स्पर्शही केला नाही. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला प्रारंभ केल्यानंतर त्याने इतका प्रदीर्घ वेळ क्रिकेटपासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

सध्या विराट उत्तम बहरात असून त्याने आशिया चषक स्पर्धेपासून 10 डावात 141.75 च्या स्ट्राईकरेटने 404 धावा फटकावल्या असून यात 3 अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे.

डेव्हिड मिलर म्हणतो, ऑस्ट्रेलियाही वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी झगडले होते!

भारताविरुद्ध टी-20 मालिका गमवावी लागली असली तरी दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मिलरने ही फारशी चिंतेची बाब नसल्याचे नमूद केले. ‘ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला, त्यापूर्वी प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्यास काही अवधी बाकी असताना ते देखील 2021 मध्ये झगडतच होते’, असे तो स्पष्टीकरणार्थ बोलताना म्हणाला. ऑस्ट्रेलियाला त्यावेळी वर्ल्डकपपूर्वी सलग 5 मालिकापराभवांचा सामना करावा लागला होता.

‘मागील वर्षभरात आम्ही उत्तम संघबांधणी केली असून संघसहकाऱयांमध्ये उत्तम समन्वय निर्माण झाला आहे. सध्या भारताविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत पराभव पत्करावा लागणे निराशाजनक होते. पण, काही चुका निश्चितच दुरुस्त करण्यासारख्या आहेत’, असे मिलर याप्रसंगी म्हणाला.

टी-20 इतिहासात 11 हजारहून सर्वाधिक धावा जमवणारे फलंदाज

धावा        फलंदाज       सामने   सर्वोच्च      शतके     अर्धशतके

14562     ख्रिस गेल     463     175 ङ       22          88

11915     केरॉन पोलार्ड          614           104        1         56

11902     शोएब मलिक           481           95 ङ      0         73

11030 विराट कोहली     354      122 ङ   6          81.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 षटकार खेचणारे फलंदाज

षटकार           फलंदाज                  संघ                  वर्ष

50                सूर्यकुमार यादव       भारत               2022

42                मोहम्मद रिझवान     पाकिस्तान        2021

41        मार्टिन गप्टील     न्यूझीलंड            2021

Related Stories

चार पार्किंगतळाच्या शुल्क आकारणीकरिता निविदा

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा कोहली दुसरा फलंदाज

Patil_p

पराभवानंतर महेंद्र चंडाळे यांचा शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा

Archana Banage

सातारा : सुरुर येथे जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या टेंपोसह दोन अटक

Archana Banage

Kolhapur : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी लवकरच

Abhijeet Khandekar

Kolhapur : संभाजीराजेंची रविवारी विशाळगडला भेट, सद्यःस्थितीची पाहणी करणार

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!