Tarun Bharat

भारत-द. आफ्रिका दुसरी टी-20 आज

Advertisements

द. आफ्रिकेविरुद्ध दुर्मीळ मालिकाविजयासाठी रोहितसेना महत्त्वाकांक्षी

गुवाहाटी / वृत्तसंस्था

स्पीडस्टार जसप्रित बुमराहला अचानक दुखापत उदभवल्यानंतर भारतीय संघासाठी हा जबरदस्त धक्का ठरला. त्यातून सावरत आज (रविवार दि. 2) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात विजयश्री मिळवत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचे संघाचे लक्ष्य असेल. भारत तूर्तास 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर आहे. आजची लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाईल.

भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-20 क्रिकेट प्रकारात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पहिलाच मालिकाविजय असणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघाची भिस्त कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झेसह कर्णधार बवूमावर असेल. नाणेफेकीचा कौल देखील तितकाच महत्त्वाचा ठरु शकतो.

वास्तविक, भारतीय संघ या महिन्याच्या मध्यापासून ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये उतरत असताना बुमराह संघाचा मुख्य आधारस्तंभ असणे अपेक्षित होते. पण, जागतिक स्तरावरील भल्याभल्या दिग्गजांना वाकुल्या दाखवणाऱया या स्पीडस्टारला ‘बॅक स्ट्रेस प्रॅक्चर’चा त्रास उद्भवला आणि तो पुढील किमान सहा महिने खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरु असलेली टी-20 मालिका आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने फायनल टय़ून-अपसाठी आयोजित केली गेली होती. पण, बुमराहच्या गैरहजेरीमुळे आता उर्वरित टी-20 मालिकेसाठी भारतासमोर उत्तरांपेक्षा प्रश्नेच अधिक उपस्थित करुन ठेवली आहेत. उमेश यादव व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश केला गेला असला तरी त्यांचा वर्ल्डकपसाठी मुख्य संघात समावेश नाही, ही वस्तुस्थिती आहे.

 बुमराहची कसर भरुन काढू शकणारा पर्यायी खेळाडू निश्चित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उर्वरित दोन टी-20 सामने पुरेसे ठरणार का, हा कळीचा प्रश्न असेल. वर्ल्डकप संघात राखीव खेळाडूत समाविष्ट असणारा शमी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळत नाही, ही आणखी एक कटू वस्तुस्थिती आहे.

शमी नुकताच कोव्हिड-19 मधून सावरला असून विदेशातील अनुभवाच्या बळावर तो ऑस्ट्रेलियात संधी मिळाल्यास उत्तम योगदान देऊ शकतो. शमीला विश्वचषकात खेळवण्याचा निर्णय झाला तर त्याला दि. 16 ऑक्टोबर रोजी होणाऱया विद्यमान जेत्याविरुद्ध सराव सामन्यानंतर लगोलग मैदानात उतरावे लागेल, हे निश्चित आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या संघात नव्याने तंदुरुस्त दीपक चहरचा समावेश असून तो वर्ल्डकप संघातही राखीव खेळाडूत समाविष्ट आहे. दीपक चहर (4-0-24-2) व डावखुरा पेसर अर्शदीप सिंग (4-0-32-3) यांनी यापूर्वी ग्रीनफिल्ड ट्रकवर दक्षिण आफ्रिकेची 5 बाद 9 अशी जोरदार दाणादाण उडवली होती. येथेही स्विंग गोलंदाजीचा वरचष्मा राहण्याचे संकेत आहेत. त्या तुलनेत सिराज अलीकडे बराच झगडत राहिला असून त्याला सूर सापडणे आवश्यक असेल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), बियॉर्न फॉर्च्युन, रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, मार्को जान्सन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पर्नेल, अँदिले पेहलुकवायो, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, रिली रॉस्यू, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज.

सामन्याची वेळ ः सायं. 7 पासून.

भुवनेश्वर कुमारचा स्वैर मारा थिंक टँकसाठी चिंताजनक

आजवर ऑस्ट्रेलियात केवळ तीनच टी-20 सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या भुवनेश्वर कुमारची अलीकडे बरीच धुलाई झाली असून यामुळे भारतीय संघव्यवस्थापनासाठी ही चिंतेत आणखी भर घालणारी बाब ठरत आहे. मागील महिन्यात आशिया चषक एलिमिनेशनमध्ये याची जोरदार प्रचिती आली होती. वर्ल्डकप-बाऊंड हर्षल पटेलला कितपत संधी देणार, यावर काही समीकरणे अवलंबून असतील. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात लागोपाठ मालिका जिंकताना पाचवा-सहावा गोलंदाज खेळवण्याची क्लुप्ती भारतासाठी उत्तम फळली होती. त्याचा यावेळी विचार होऊ शकतो.  

फिरकीच्या आघाडीवर मात्र फारशी चिंता नाही

एकीकडे, जलद गोलंदाजीच्या आघाडीवर काही समस्या उभे ठाकले असले तरी त्या तुलनेत फिरकी आघाडीवर मात्र भारतीय संघ निश्ंिचत असेल. वास्तविक, रविंद्र जडेजासारखा दिग्गज फिरकी अष्टपैलू गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर असला तरी अक्षर पटेलने त्याची जागा पुरेपूर भरुन काढली आहे. मागील मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केला, त्यावेळी त्याने 7.87 च्या सरासरीने सर्वाधिक 8 बळी घेतले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातही त्याने मधल्या षटकात गोलंदाजी करताना 16 धावात 1 बळी, असे पृथक्करण नोंदवले आहे.

फलंदाजीत बिग-4 वर मुख्य भिस्त

भारतीय संघ आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, त्यावेळी स्टार फलंदाजांची लाईनअप हे बलस्थान असेल. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने अलीकडेच शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणला असून केएल राहुलला देखील सूर सापडला आहे. याशिवाय, रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ‘एक्स-फॅक्टर’ ठरु शकतो. दिनेश कार्तिक अव्वल दर्जाचा फिनिशर असला तरी मागील 7 सामन्यात त्याच्या वाटय़ाला केवळ 9 चेंडू आले आहेत. त्यामुळे, त्याला बढतीवर फलंदाजीला पाठवले जाणार का, याची उत्सुकता असेल.

Related Stories

अश्विनने एक नऊ ‘लपवला’, तरीही…!

Patil_p

विजयपथावर परतण्याची राजस्थानची महत्त्वाकांक्षा

Patil_p

अन्वर अलीचा वैद्यकीय अहवाल एएफसीकडे दाखल

Patil_p

बुचार्ड, करमन कौरची विजयी सलामी

Patil_p

दुबईत घोंघावले ‘सुपरमॅन’चे वादळ!

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या डावात ग्रीन, कॅरे यांची अर्धशतके

Patil_p
error: Content is protected !!