Tarun Bharat

भारत-द. आफ्रिका पहिली टी-20 आज

Advertisements

उभय संघांतील 3 सामन्यांची टी-20 मालिका

थिरुवनंतपूरम / वृत्तसंस्था

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून (बुधवार दि. 28) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱया 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत वर्ल्डकपसाठी पूर्वतयारीवर शेवटचा हात फिरवेल. आज उभय संघांत पहिली टी-20 होत असून यजमान संघ काही नव्या खेळाडूंना आजमावणार का, याची उत्सुकता असेल. उभय संघातील या लढतीला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होणार आहे.

कर्णधार रोहितने यापूर्वी डेथ ओव्हर्समध्ये आपल्याला अद्याप बरीच सुधारणा करावी लागेल, असे स्पष्ट केले असून भारताला या मालिकेत हार्दिक पंडय़ा व भुवनेश्वर कुमार या दोन मुख्य गोलंदाजांशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूत समाविष्ट असणारा मोहम्मद शमी अद्याप कोरोनावर मात करुन परतू शकलेला नाही आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत देखील तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हर्षल पटेलला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर सापडला नाही. पण, येथे वर्ल्डकपपूर्वी तीन सामन्यात सर्वोत्तम बहरात परतण्याचे त्याचे प्रयत्न असतील. हर्षलची कारकिर्दीतील इकॉनॉमी 9.05 इतकी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र त्याने 12 पेक्षा अधिक सरासरीने धावा मोजल्या.

वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूत समाविष्ट आणखी एक खेळाडू दीपक चहरला देखील मागील मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. संघाने जलद-मध्यमगती गोलंदाजांना रोटेट करण्याचा निर्णय घेतला तर चहरला संधी मिळू शकते. पाठदुखीतून सावरल्यानंतर पूर्ण बहरात येण्यासाठी प्रयत्नशील जसप्रित बुमराहबरोबर अर्शदीप सिंगवर स्लॉग ओव्हर्समधील जबाबदारी असू शकते.

वर्ल्डकपपूर्वी सर्व खेळाडूंना आजमावण्याचे रोहितने संकेत दिले असल्याने त्या पार्श्वभूमीवर, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळू शकते. फलंदाजीच्या आघाडीवर रोहित शर्मा व विराट कोहली उत्तम बहरात असून केएल राहुल देखील फलंदाजीत आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी सज्ज असेल. दिनेश कार्तिकला आणखी संधी दिली जाईल, असे रोहितने यापूर्वीच स्पष्ट केले असून श्रेयस अय्यर हा हुडाच्या जागी संघात येईल, असे संकेत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, बियॉर्न फॉर्च्युईन, रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, मार्को जान्सन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पार्नेल, अँदिले फेहलुकवायो, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, रिली रॉस्यू, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज.

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रित बुमराह.

सामन्याची वेळ ः सायंकाळी 7 वा.

संजय मांजरेकर म्हणतात, योग्य वेळी बहरतोय विराटचा पॉवर गेम!

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर विराट कोहलीचा पॉवर गेम परततोय, ही स्वागतार्ह बाब असल्याचे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. विराट कोहली तब्बल 3 वर्षे खराब फॉर्ममध्ये होता. त्यानंतर त्याने महिनाभराचा ब्रेक घेतला आणि आशिया चषक स्पर्धेत जोरदार पुनरागमन करत त्याने आपला पॉवर गेम दाखवून दिला. त्या पार्श्वभूमीवर, मांजरेकर बोलत होते.

‘आशिया चषक स्पर्धेपासून जवळपास प्रत्येक सामन्यात विराट उत्तम खेळत आला आहे. माझ्या मते त्याचा पॉवर गेम परतत आहे. त्याचे फटके पूर्ववत होत आहेत आणि धावांची ही आतषबाजी स्वागतार्ह आहे. अगदी उत्तम चेंडूंवर देखील त्याने चौकार-षटकाराची बरसात करणे तो फॉर्ममध्ये परतल्याचे स्पष्ट संकेत आहेत’, असे मांजरेकर पुढे म्हणाले.

आशिया चषक स्पर्धेतील 5 सामन्यात विराटने 92.00 च्या सरासरीने 276 धावांची आतषबाजी केली असून स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो दुसऱया स्थानी राहिला.

‘आशिया चषक स्पर्धेत चेंडू बॅटच्या मधोमध बसू लागला. त्याचे पूलचे फटके हवे तसे येऊ लागले आणि ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये तो फटकेबाजी करत आला, त्याची प्रचिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही येऊ लागली. भारतीय संघासाठी विश्वचषक तयारीच्या दृष्टीने ही उत्तम बाब आहे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.

मागील मालिकेत खराब फॉर्म

विराटने आशिया चषक स्पर्धा गाजवली असली तरी त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीत खेळवल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याला एकत्रित 76 धावांवर समाधान मानावे लागले. त्यातही 63 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. भारताने ती मालिका 2-1 फरकाने जिंकली. सीमर भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल या दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱया खेळाडूंची गोलंदाजी महागडी ठरली. त्यांनी षटकामागे 12 पेक्षा अधिक सरासरीने धावांची लयलूट करु दिली होती.

भारतात नव्या चेंडूला सामोरे जाणे आव्हानात्मक ः बवूमा

भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पॉवर प्लेमध्ये स्विंग होत असलेल्या चेंडूला सामोरे जाणे आव्हानात्मक असेल, असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकन कर्णधार तेम्बा बवूमाने केले.

भारताने अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 0-1 अशा पिछाडीवरुन मजबूत फलंदाजीच्या बळावर  2-1 असा विजय संपादन केला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत टी-20 वर्ल्डकपपूर्वी आणखी एक ड्रेस रिहर्सल रंगणे अपेक्षित आहे.

‘प्रारंभी, सावध पवित्र्यावर भर देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, भुवनेश्वर, बुमराहसारखे अव्वल गोलंदाज दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करत असतील तर त्यांना सामोरे जाणे सोपे असत नाही. उमेश यादव, हर्षल पटेल, अर्शदीप यांच्यामुळे भारताची जलद-मध्यमगती गोलंदाजी लाईनअप मजबूत आहे’, असे बवूमा येथे म्हणाला.

बॉक्स

बवूमासमोर आव्हाने अनेक! दक्षिण आफ्रिकेत लवकरच उद्घाटनाची दक्षिण आफ्रिका टी-20 लीग होणार असून त्याचा लिलाव अलीकडेच पार पडला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे विद्यमान कर्णधार बवूमाला त्यात एकाही संघाने बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. या पार्श्वभूमीवर, बवूमाला सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि त्याचबरोबर संघसहकाऱयांकडूनही अपेक्षित कामगिरी करवून घ्यावी लागेल. हे दुहेरी आव्हान त्याला किती पेलवणार, हे या मालिकेत स्पष्ट होईल

Related Stories

आज फातोडर्य़ात होणार एफसी गोवा आणि मुंबई सिटीत स्फोटक लढत

Patil_p

प्लेऑफ सामने 29 ते 31 मे दरम्यान

Patil_p

गिलच्या द्विशतकाने भारत अ संघाची कसोटी अनिर्णित

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून रशियन टेनिसपटूची माघार

Patil_p

प्रो हॉकी लीग मोसम वाढविण्याचा निर्णय

Patil_p

विंडीजच्या वनडे, टी-20 संघांचे नेतृत्व पूरनकडे

Patil_p
error: Content is protected !!