वृत्तसंस्था/ नवी दिली
भारतीय क्लबांसाठीचे 2023-24 मोसमातील एएफसी स्पर्धांचे पात्रता सामने 4 एप्रिल ते 3 मेदरम्यान खेळवले जातील, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) सांगितले आहे. एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने (एएफसी) भारताला तीन स्थाने दिली आहेत. यापैकी एक एएफसी चॅम्पियन्स लीग गट टप्प्यात, एक एएफसी चषक स्पर्धेच्या गट टप्प्यात आणि एक स्थान एएफसी चषक पात्रता स्पर्धेत देण्यात आले आहे. या तिन्ही स्थानांसाठीचे पात्रता सामने वरील कालावधीत खेळवले जातील.
एएफसी चषक स्पर्धेच्या गट टप्प्यातील स्थानासाठी आय-लीग 2021-22 चा विजेता (गोकुलम केरळ एफसी) आणि 2023 सुपर कपचा विजेता यांच्यात आवश्यकता भासल्यास 29 एप्रिल रोजी सामना होईल. सुपर कपचा विजेता 25 एप्रिल रोजी निश्चित होईल. जर एएफसी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरलेल्या संघाने 2023 चा सुपर कप जिंकल्यास गोकुलम केरळला सामना खेळण्याची गरज न पडता तो एएफसी चषक स्पर्धेच्या गट टप्प्यासाठी आपोआप पात्र होईल.
एएफसी चषक प्राथमिक फेरीसाठीचा संघ आयएसएल 2021-22 चा विजेता (हैदराबाद एफमसी) आणि आयएसएल 2022-23 चा विजेता (बेंगळूर एफसी किंवा मोहन बागान एफसी) यांच्यातील सामन्याद्वारे निश्चित केला जाईल. गरज भासल्यास हा पात्रता सामना 3 मे रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे.