दुसऱया सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडय़ांनी विजय
वृत्तसंस्था/ लखनौ
येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात यजमान भारताने न्यूझीलंडवर 6 गडय़ांनी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी, विशेषतः फिरकी गोलदाजांनी अप्रतिम कामगिरी करीत फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडले. नाबाद 26 धावा करणाऱया सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार मिळाला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताच्या भेदक माऱयापुढे त्यांना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 99 धावा जमविल्या. या माफक धावसंख्येचा पाठलाग करतानाही भारतीय संघाला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. टिकनरने टाकलेल्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने चौकार मारत भारताचा विजय साकार केला. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.
न्यूझीलंडच्या डावात फिन ऍलन व कॉनवे यांनी प्रत्येकी 11, मार्क चॅपमन व मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 14, कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 19 धावा जमविल्या. अर्शदीप सिंगने 7 धावांत 2, हार्दिक पंडय़ा, सुंदर, चहल, दीपक हुडा, कुलदीप यादव यांनी एकेक बळी मिळविला. भारतीय डावात गिलने 11, इशान किशनने 19, राहुल त्रिपाठीने 13, सूर्यकुमार यादवने नाबाद 26, सुंदरने 10, कर्णधार हार्दिकने नाबाद 15 धावा केल्या. 15 व्या षटकात 4 बाद 70 अशा स्थितीनंतर सूर्या व हार्दिक यांनी अभेद्य 31 धावांची भागीदारी करून विजय साजरा केला. ब्रेसवेल, ईश सोधी यांनी एकेक बळी मिळविला तर किशन व सुंदर धावचीत झाले. विशेष म्हणजे या सामन्यात एकही षटकार नोंदवला गेला नाही.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकांत 8 बाद 99 ः ऍलन व कॉनवे प्रत्येकी 11, चॅपमन व ब्रेसवेल प्रत्येकी 14, सँटनर नाबाद 19, अवांतर 10. गोलंदाजी ः अर्शदीप 2-7, चहल 1-4, सुंदर, हुडा, कुलदीप प्रत्येकी 1-17, हार्दिक 1-25. भारत 19.5 षटकांत 4 बाद 101 ः गिल 11, इशान किशन 19, राहुल त्रिपाठी 13, सूर्यकुमार यादव नाबाद 26, सुंदर 10, हार्दिक नाबाद 15, अवांतर 7. गोलंदाजी ः ब्रेसवेल 1-13, सोधी 1-24.