दिनेश कार्तिकचे 16 वर्षांनंतर पहिले टी-20 अर्धशतक, 18 धावात 4 बळीं, अवेशचे वडिलांना बर्थडे गिफ्ट
वृत्तसंस्था/ राजकोट
सामनावीर दिनेश कार्तिकचे टी-20 पदार्पणानंतर तब्बल 16 वर्षांच्या अंतराने झळकावलेले पहिलेवहिले अर्धशतक आणि अवेश खानच्या 18 धावातील 4 बळींच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात 82 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला आणि मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. प्रारंभी, 6 बाद 169 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर भारताने द. आफ्रिकेला 16.5 षटकात सर्वबाद 87 धावांवर गुंडाळले. द. आफ्रिकेसाठी ही टी-20 क्रिकेटमधील निचांकी धावसंख्या ठरली.
भारताने 6 बाद 169 धावा केल्यानंतर या मालिकेत दक्षिण आफ्रिकन संघ सलग दुसऱयांदा फलंदाजीत अपयशी ठरला आणि त्यांचा डाव 16.5 षटकात अवघ्या 87 धावांमध्येच खुर्दा झाला. कर्णधार तेम्बा बवूमाला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. अवेश खानने अवघ्या 18 धावात 4 बळी घेतले. त्याची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी देखील ठरली. टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध एखाद्या संघाची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
भुवनेश्वर कुमार व अवेश खान यांनी नव्या चेंडूवर भेदक गोलंदाजी साकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पॉवर प्लेअखेर 2 बाद 35 अशी दैना उडाली. तेम्बा बवूमाला खांदा दुखावल्याने तंबूत परतावे लागले. तो अगदी बक्षीस वितरणासाठीही मैदानात येऊ शकला नाही. मनगटाच्या दुखापतीमुळे मागील दोन सामने खेळू न शकलेल्या क्विन्टॉन डी कॉकला 14 धावांवर समाधान मानावे लागले. प्रिटोरियससमवेत धाव घेण्यात गोंधळ उडाल्यानंतर त्याला धावचीत होत परतावे लागले. या खेळपट्टीवर दुसऱयांदा फलंदाजी करणेही कठीण ठरत गेले आणि याचा द. आफ्रिकन संघाला फटका बसत गेला. सातत्याने गडी बाद होत राहिल्याने ते एकदाही विजयपथावर नव्हते.
या लढतीत भारतीय संघ एकवेळ 4 बाद 81 अशा अडचणीच्या स्थितीत होता. मात्र, याचवेळी हार्दिक पंडय़ा (31 चेंडूत 46) व दिनेश कार्तिक (27 चेंडूत 55) यांनी तडाखेबंद फलंदाजी साकारत पाचव्या गडय़ासाठी 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.
हार्दिक पंडय़ा व दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीमुळेच भारताला शेवटच्या 5 षटकात 73 धावांची लयलूट करता आली. आघाडीचा स्पीडस्टार कॅगिसो रबाडा दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता. मात्र, यानंतरही दक्षिण आफ्रिकन संघाने भारताला पॉवर प्लेच्या 6 षटकाअखेर बॅकफूटवर ठेवण्यात यश मिळवले.
दुसरा जलद गोलंदाज वेन पार्नेल देखील दुखापतीमुळे खेळू शकला नाही. स्टार सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक मात्र रिझा हेन्ड्रिक्सच्या जागी संघात परतला. पॉवर प्लेची 6 षटके पूर्ण झाल्यानंतर पुढील पहिल्याच चेंडूवर भारताचा पहिला गडी परतला आणि 6.1 षटकात 1 बाद 40 अशी संघाची स्थिती झाली.
ऍनरिच नोर्त्झेने 26 चेंडूत 27 धावा जमवणाऱया इशान किशनला आपल्या पहिल्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. इशानने नोर्त्झेचा शॉर्ट बॉल थर्डमॅनकडे टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात सपशेल अंदाज चुकल्यानंतर डी कॉककडे सोपा झेल देत इशान परतला. द. आफ्रिकेच्या अव्वल दर्जाच्या जलद गोलंदाजीसमोर भारतीय संघ या पूर्ण मालिकेत सातत्याने झगडत आला असून त्याचीच प्रचिती या लढतीतही आली.
मागील सामन्यात सूर सापडलेल्या ऋतुराज गायकवाडने लुंगी एन्गिडीच्या किंचीत उसळलेल्या चेंडूवर यष्टीमागे सोपा झेल दिला. या मालिकेत उसळत्या चेंडूवर अधिक बाद झालेल्या अय्यरला या लढतीत मार्को जान्सनच्या गुडलेंग्थ चेंडूचा अंदाज आला नाही. मात्र, तो पायचीत बाद दिला जाण्यासाठी द. आफ्रिकेला डीआरएस घ्यावा लागला. जान्सनचा हा टी-20 पदार्पणातील पहिला बळी ठरला.
कर्णधार रिषभ पंत व हार्दिक पंडय़ा यांनी दक्षिण आफ्रिकेची सर्वात कमकुवत बाजू असलेल्या फिरकीवर आक्रमण चढवले आणि यामुळे भारताला 170 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता
आले.
हार्दिक पंडय़ाने तबरेझ शमसीला लागोपाठ षटकार खेचले तर पंतने काही आक्रमक फटके लगावले. मात्र, नंतर तो पुन्हा एकदा वाईड बॉलवर विकेट फेकत तंबूत परतल्याने निराशा झाली. केशव महाराजचा यष्टीच्या बराच बाहेर असलेला चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात पंतने शॉर्ट थर्डमॅनकडे झेल दिला. पंतने वाईड ऑफ ऑफ स्टम्प चेंडूवर बाद होण्याची या मालिकेतील ही चौथी वेळ ठरली. डावातील उत्तरार्धात दिनेश कार्तिकचे धुवांधार अर्धशतक भारतीय डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. डिसेंबर 2006 मध्ये टी-20 पदार्पण केल्यानंतर त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. कार्तिकने स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नरच्या दिशेने फटकेबाजीवर अधिक भर दिला. शिवाय, स्लॉग स्वीपचे फटके उत्तमरित्या घोटवले. डेव्हॉन प्रिटोरियसला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेचलेला स्लॉग स्वीपचा त्याचा षटकार लक्षवेधी ठरला.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 6 बाद 169 (दिनेश कार्तिक 27 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 55, हार्दिक पंडय़ा 31 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 46, इशान किशन 27. द. आफ्रिका ः 16.5 षटकात सर्वबाद 87. अवेश 4-18)