अंतिम लढतीत इंग्लंडवर सात गडय़ांनी विजय, इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स मालिकावीर, भारताची तितास साधू सामनावीर
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रुम
19 वर्षाखालील वयोगटाच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे आयसीसीच्या पहिल्या टी-20 विश्वचषक महिलांच्या स्पर्धेचे अजिंक्यपद निर्विवादपणे पटकावले. आयसीसीने ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली होती आणि नव्या वर्षाच्या प्रारंभीच भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब करण्याचा बहुमान मिळवला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाने शेवटपर्यंत एकही सामना गमावला नाही. इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला ‘मालिकावीर’ तर भारताच्या तितास साधूला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा अंतिम सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा बाळगली जात होती, कारण इंग्लंडने या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण भारतीय संघाच्या अप्रतिम अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघ वरचढ ठरला.


या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. साधू, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा तसेच मन्नत कश्यप, कर्णधार शेफाली वर्मा, सोनम यादव यांनी आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला केवळ 17.1 षटकात 68 धावात उखडले. त्यानंतर भारताने 14 षटकात 3 बाद 69 धावा जमवत हा सामना तसेच स्पर्धेचे अजिंक्यपद 6 षटके बाकी ठेवून जिंकले.
इंग्लंडच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. साधूच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीची फलंदाज लिबर्टी हीप खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाली. साधूने स्वतःच हा झेल टिपला. कर्णधार स्क्रिव्हन्स आणि हॉलंड यांनी सावध फलंदाजी करण्यावर भर दिला. इंग्लंडच्या डावातील चौथ्या षटकात अर्चना देवीने हॉलंडचा त्रिफळा उडवला. हॉलंडने 8 चेंडूत 2 चौकारासह 10 धावा जमवल्या. अर्चना देवीने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर कर्णधार स्क्रिव्हन्सलाही त्रिशाकरवी झेलबाद केले. स्क्रिव्हन्सने 4 धावा जमवल्या. साधूने डावातील सातव्या षटकात सोफिया स्मेलचा त्रिफळा उडवला. तिने 3 धावा जमवल्या. मॅकडोनाल्ड आणि चॅरिस पॅव्हेली या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 17 धावांची भर घातली. पार्श्वी चोप्राने पॅव्हेलीला 2 धावावर पायचित करीत ही जेडी फोडली. इंग्लंडचा निम्मा संघ 10 षटकाअखेर 39 धावात तंबूत परतला होता. पार्श्वी चोप्राने आपल्या पुढील षटकात मॅकडोनाल्ड गेला अर्चना देवीकडे झेल देण्यास भाग पाडले. अर्चनाने उजवीकडे झेपावत हा एकहाती अप्रतिम झेल टिपला. तिने 24 चेंडूत 3 चौकारासह 19 धावा जमवल्या. तिवारीच्या अचूक फेकीवर ग्रोव्हेस 4 धावावर धावचित झाली. कर्णधार शेफाली वर्माने बेकरला घोषकरवी यष्टीचित केले. काश्यपने स्टोनहाऊसला यादवकरवी झेलबाद केले. तिने 25 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या स्मेलीने 7 चेंडूत 2 चौकारासह 11 धावा जमवल्या. सोनम यादवने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्मेलला टिपत इंग्लंडचा डाव 17.1 षटकात 68 धावांत संपुष्टात आणला. इंग्लंडच्या डावात 8 चौकार नोंदवले गेले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी किफायतशील मारा केला. साधू, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी 2 तर कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सौम्या-त्रिशाचा संयमी खेळ
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार शेफाली वर्मा आणि या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणाऱया श्वेता सेहरावतने सलामीच्या गडय़ासाठी 13 चेंडूत 16 धावांची भर घातली. मात्र, या अंतिम सामन्यात सेहरावतला अधिक धावा जमवता आल्या नाहीत. भारताच्या डावातील तिसऱया षटकात कर्णधार शेफाली वर्मा बेकरच्या गोलंदाजीवर स्टोनहाऊसकरवी झेलबाद झाली. शेफालीने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमवताना सेहरावतसमवेत पहिल्या गडय़ासाठी 13 चेंडूत 16 धावांची भर घातली. यानंतर चौथ्या षटकात स्क्रिव्हन्सने सेहरावतला बेकरकरवी झेलबाद केले. तिने 6 चेंडूत 1 चौकारासह 5 धावा जमवल्या. भारताची स्थिती यावेळी 3.4 षटकात 2 बाद 20 अशी होती.
सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी संयमी खेळ करीत तिसऱया गडय़ासाठी 46 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डावातील 13 व्या षटकात स्टोनहाऊसने त्रिशाचा त्रिफळा उडवला. त्रिशाने 29 चेंडूत 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. त्रिशा बाद झाली त्यावेळी भारताला विजयासाठी 3 धावांची जरुरी होती. सौम्या तिवारी आणि ऱिहषिता बासू या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. तिवारीने विजयी एकेरी धाव घेतली. भारताने 14 षटकात 3 बाद 69 धावा जमवल्या. भारताच्या डावात 1 षटकार आणि 8 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे बेकर, स्क्रिव्हन्स आणि स्टोनहाऊस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सने आपल्या शानदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवले. पण तिला आपल्या संघाला अजिंक्यपद मिळवून देता आले नाही. स्क्रिव्हन्सने या स्पर्धेत फलंदाजीत एकूण 293 धावा जमवल्या. तर गोलंदाजीत तिने 9 गडी बाद केल्याने तिची मालिकावीरासाठी निवड करण्यात आली. रविवारच्या अंतिम सामन्यात भारताची गोलंदाज तितास साधूने आपल्या 4 षटकात केवळ 6 धावात 2 गडी बाद केल्याने तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 17.1 षटकात सर्व बाद 68 (स्क्रिव्हन्स 4, हीप 0, हॉलंड 10, सेरेन स्मेल 3, मॅकडोनाल्ड 19, पॅव्हेली 2, स्टोनहाऊस 11, ग्रोव्हेस 4, बेकर 0, सोफिया स्मेल 11, अवांतर 4. गोलंदाजी ः तितास साधू 2-6, अर्चना देवी 2-17, पार्श्वी चोप्रा 2-13, कश्यप 1-13, शेफाली वर्मा 1-16, सोनम यादव 1-3).
भारत 14 षटकात 3 बाद 69 (शेफाली वर्मा 15, श्वेता सेहरावत 5, सौम्या तिवारी नाबाद 24, गेंगाडी त्रिशा 24, बासू नाबाद 0, अवांतर 1. गोलंदाजी ः बेकर 1-13, स्क्रिव्हन्स 1-13, स्टोनहाऊस 1-8).