वृत्तसंस्था/ हो चि मिन्ह सिटी
भारतीय पुरुष फुटबॉल संघ सध्या व्हिएतनामच्या दौऱयावर सरावाकरता मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या सरावाच्या फुटबॉल मालिकेतील गेल्या शनिवारी पहिला सामना आयोजित करण्यात आला होता. आता या मालिकेतील दुसरा सामना व्हिएतनामबरोबर मंगळवारी खेळविला जाणार आहे.
गेल्या शनिवारच्या सामन्यात सिंगापूरने भारताला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. तर दुसऱया सरावाच्या सामन्यात व्हिएतनामने सिंगापूरचा 4-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे व्हिएतनाम संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. मंगळवारच्या सामन्यात भारतीय फुटबॉलपटूंना बचावफळी अधिक भक्कम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय संघाला स्टिमॅक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मित्रत्वाच्या सरावाच्या या स्पर्धेमध्ये भारत, व्हिएतनाम आणि सिंगापूर हे संघ सहभागी झाले आहेत. मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाची सत्वपरीक्षा ठरेल.