अंतिम लढतीत यजमान स्पेनवर एकमेव गोलने मात, गुरजित कौरने नोंदवला गोल
वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया, स्पेन
येथे झालेल्या महिलांच्या एफआयएच नेशन्स कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय महिलांनी यजमान स्पेनचा एकमेव गोलने पराभव करून जेतेपद पटकावले आणि 2023-24 मध्ये होणाऱया एफआयएच प्रो हॉकी लीगमध्येही स्थान मिळविले.
ही स्पर्धा जिंकणाऱया संघाला पुढील मोसमात होणाऱया महिला प्रो लीग हॉकीमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती आणि भारताने या पहिला नेशन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावत ही पात्रता मिळविली. या सामन्याच्या पहिल्या सत्रात गुरजित कौरने पाचव्या मिनिटाला गोल नोंदवला. नंतरच्या तीनही सत्रात एकही गोल होऊ न शकल्याने हाच गोल शेवटी निर्णायक ठरला.
स्पेनने पहिल्या मिनिटाला चांगला खेळ करीत जवळपास आघाडीही घेतली होती. पण भारतीय कर्णधार व गोलरक्षक सविता पुनियाने जलद हालचाली करीत त्यांचा पेनल्टी कॉर्नरवरील फटका अचूक अडविल्याने त्यांची ही संधी वाया गेली. पाचव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या स्पर्धेत भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याने प्रशिक्षक यानेक शॉपमन यांनी चिंता व्यक्त केली होती. पण यावेळी गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरवर अचूक ड्राईव्ह करीत गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली.
या गोलनंतर आठव्या मानांकित भारत व या स्पर्धेत परिपूर्ण डिफेन्सिव रेकॉर्ड असणारा स्पेन यांनी चुरशीचा खेळ केला आणि एकमेकांना पुन्हा गोल करण्याची संधी दिली नाही. पूर्वार्ध संपण्याआधी फक्त दोन पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाल्या होत्या. स्पेनची गोलरक्षक क्लारा पेरेझने पूर्ण स्ट्रेच करीत गुरजित कौरला दुसरा गोल करू दिला नाही तर भारतीय गोलरक्षक सविता पुनियानेही अप्रतिम गोलरक्षण करीत लुसिया जिमेनेझचा प्रयत्न फोल ठरविला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमण तेज केले. पण दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयशच आले. क्लारा पेरेझने आखणी एकदा अप्रतिम बचाव करीत भारताची पेनल्टी कॉर्नर संधी वाया घालविली. अखेरच्या टप्प्यात स्पेनने जबरदस्त आक्रमण करीत भारतावर दबाव आणला होता. पण भारताने त्यांना रोखण्यात यश मिळवित जेतेपद आणि पुढील मोसमातील प्रो लीग हॉकीमधील स्थानही निश्चित केले.