रोमांचक अंतिम लढतीत पोलंडला 6-4 फरकाने नमवले, भारताची साखळी फेरीतील वर्चस्वाची मालिका
लुसाने / वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडविरुद्ध रोमांचक अंतिम लढतीत 6-4 फरकाने विजय मिळवत उद्घाटनाच्या एफआएच हॉकी फाईव्ह स्पर्धेचे जेतेपद संपादन केले. भारतीय संघातर्फे बॉबी सिंग धामी (11 व 19 वे मिनिट), मोहम्मद राहील (13 व 17 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 2 गोल करत या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय संजयने 8 व्या मिनिटाला तर गुरिंदरने 9 व्या मिनिटाला गोल केले. पोलंडतर्फे मॅतेयूस्झ (पहिले मिनिट), रॉबर्ट पॉलक (5 वे मिनिट), रुतोस्की (5 वे मिनिट) व कर्णधार जॅसेक कुरोस्की (18) यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
पोलंडतर्फे पहिल्या 5 पाच मिनिटातच तीन गोल झाले आणि त्यांनी एकतर्फी आघाडी मिळवली. मिळालेल्या तिन्ही संधींचे गोलमध्ये रुपांतर करण्यात यश मिळाल्याने ते भक्कम स्थितीत पोहोचले. मॅतेयूस्न्झने सामन्यातील पहिल्याच मिनिटाला पोलंडचे खाते उघडले तर पाचव्या मिनिटात पॉलक व रुतोस्की यांनी प्रत्येकी 1 गोल करत आघाडी भरभक्कम केली.
भारताचेही चोख प्रत्युत्तर
पोलंडचा संघ पहिल्या 5 मिनिटातच 3-0 असा आघाडीवर पोहोचल्यानंतर दडपण जरुर होते. पण, यानंतर भारताने देखील लागोपाठ गोलचा धडाकाच लावला आणि पोलंडची आघाडी कमी केली. संजय व गुरिंदर सिंग यांनी आठव्या व नवव्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. दुसऱया सत्रात भारतीय संघासाठी आणखी सकारात्मक सुरुवात झाली. 11 व्या मिनिटाला बॉबी सिंग धामीने बरोबरीचा गोल केला. पुढे 13 व्या मिनिटाला राहीलने भारताला सामन्यात प्रथमच आघाडी मिळवून दिली आणि यानंतर भारत पिछाडीवर राहिला नाही.
17 व्या मिनिटाला राहीलने संघाचा पाचवा गोल केला. पण, पोलंडने कर्णधार कुरोस्कीच्या 18 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे आपण मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला. खेळ अंतिम टप्प्याकडे झुकत असताना बॉबी सिंग धामीने उशिरा गोल नोंदवला आणि निर्धारित वेळेअखेर भारताच्या 6-4 फरकाने विजयावर शिक्कामोर्तब झाले.
स्पर्धेत भारताची उत्तम कामगिरी
त्यापूर्वी, भारताने मलेशिया व पोलंडविरुद्ध देखील एकतर्फी विजय नोंदवत अंतिम फेरीत धडक मारली होती त्यांनी मलेशियाचा 7-3 व पोलंडचा 6-2 असा धुव्वा उडवत आपली हुकूमत अधोरेखित केली.
भारताने आपल्या तिसऱया लढतीत मलेशियाला एकतर्फी फरकाने नमवले, त्यावेळी राहीलची हॅट्ट्रिक लक्षवेधी ठरली. त्याने 8 व्या, 14 व्या व 18 व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय, गुरसाहिबजीत सिंग (पहिले व 17 वे मिनिट) व संजय सिंग (10 वे व 12 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 2 गोल केले होते. मलेशियातर्फे फिर्दोस रोस्दी (चौथे व 13 वे मिनिट) व कर्णधार नबिल नूर (9 वे मिनिट) यांनी गोल केले होते.
भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल केला आणि आक्रमक पवित्र्याची वर्दी दिली. गुरुसाहिबजीतने पहिला गोल केल्यानंतर रोस्दीने चौथ्या मिनिटाला मलेशियाला बरोबरी मिळवून दिली. राहीलने संघाला दुसऱयांदा गोल करत भारताला आघाडीवर नेले. मात्र, कर्णधार नबिल नूरच्या गोलमुळे मलेशियाने पुन्हा बरोबरी मिळवली. पहिल्या सत्रातील शेवटच्या टप्प्यात संजयच्या उत्तम गोलमुळे भारताला 3-2 अशी आघाडी प्राप्त करता आली.
दुसऱया टप्प्यातील पहिल्या तीन मिनिटात भारत व मलेशिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 गोल केला. संजयने भारताचा चौथा व त्याचा सामन्यातील दुसरा गोल 12 व्या मिनिटाला केला तर रोस्दीने 13 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. नंतर मात्र राहुलने 14 व्या व 18 व्या मिनिटाला आणखी दोन गोल करत संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. येथेच त्याने आपली हॅट्ट्रिकही साजरी केली. गुरसाहिबजीतने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल 17 व्या मिनिटाला केला.
पोलंडचाही 6-2 फरकाने धुव्वा
आपल्या शेवटच्या साखळी सामन्यातही भारताने पोलंडचा 6-2 असा धुव्वा उडवला. त्या विजयातही राहीलने लक्षवेधी खेळ साकारत 2 गोल केले. त्याने चौथ्या व नवव्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल केला. याशिवाय, संजय (2), गुरसाहिबजीत सिंग (7), मनदीप मोर (10), रबिचंद्रा (15) यांनी भारताच्या विजयात प्रत्येकी एक गोलसह समयोचित वाटा उचलला. पोलंडतर्फे ग्रॅस्जन (13) व कर्णधार जॅसेक कुरोस्की (16) यांनी गोल केले.