वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद यजमान भारताने पटकाविले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात भारताचा हुकमी स्ट्रायकर गुरुकिरातसिंगने 4 गोल नोंदविले.
हा अंतिम सामना मध्यंतरापर्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. त्यानंतर निर्धारित वेळेत पुन्हा गोलकोंडी कायम राहिली. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल नोंदविले होते. या सामन्यात भारताचा फुटबॉलपटू गुरुकिरातसिंगने पहिल्या मिनिटाला, 60 व्या, 94 व्या आणि 99 व्या मिनिटाला असे चार गोल नोंदविले. भारताचा पाचवा गोल हिमांशू जेंग्राने 92 व्या मिनिटाला केला. बांगलादेशतर्फे रेजॉन होलदार आणि शाहीन मिया यांनी अनुक्रमे 44 व्या आणि 48 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले.
या सामन्यात निर्धारित वेळेत गोलकोंडी कायम राहिल्याने पंचांनी जादा वेळेचा अवलंब केला. जादा कालावधीतील दुसऱया मिनिटाला हिमांशूने भारताला आघाडीवर नेले. या सामन्यात गुरुकिरातसिंगने 94 व्या मिनिटाला आपली हॅटट्रिक पूर्ण केली. भारताचा पाचवा आणि शेवटचा गोल 99 व्या मिनिटाला नोंदविला गेला. या अंतिम सामन्याचे उद्घाटन ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संघातील गुरुकिरातसिंग हा या स्पर्धेतील महत्त्वाचा खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविले. भारतीय संघातील सोमकुमारला गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार देण्यात आला.