Tarun Bharat

सॅफ यू-17 चॅम्पियनशिपमध्ये भारताला जेतेपद

कोलंबोत संपन्न झालेल्या अंतिम फेरीत नेपाळवर चार गोल्सनी मात, गाईट सर्वोत्तम खेळाडू, साहिल सर्वोत्तम गोलरक्षक

वृत्तसंस्था /कोलंबो

विद्यमान विजेत्या भारताने सफाईदार प्रदर्शन करीत येथे झालेल्या सॅफ यू-17 फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारताने नेपाळचा 4-0 एकतर्फी धुव्वा उडवित जेतेपद स्वतःकडेच राखण्यात यश मिळविले.

बॉबी सिंग, कोरू सिंग, कर्णधार वनलालपेका गाईट व अमन यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. साखळी फेरीत नेपाळने भारतावर 3-1 असा विजय मिळविला होता. त्याची परतफेड भारताने अंतिम फेरीत केली. या सामन्यात प्रारंभापासून भारताने वर्चस्व राखले. नेपाळच्या बचावातील गॅप्सचा लाभ घेत भारताने 18 व्या मिनिटाला पहिले यश मिळविले. रिकी मीतेई व गाईट यांनी रचलेल्या चालीवर बॉबी सिंगने हेडरवर हा गोल नोंदवला. बारा मिनिटांनंतर गाईटने आणखी एका गोलसाठी मदत केली. त्याने दिलेल्या थ्रू पासवर कोरू सिंगने नेपाळच्या गोलरक्षकाला चकवा देत भारताचा दुसरा गोल केला.

दोन गोलांच्या पिछाडीनंतर नेपाळने आक्रमक खेळाचे धोरण अवलंबले. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. निराश झाल्यामुळे 39 व्या मिनिटाला नेपाळचा कर्णधार प्रशांत लक्समने भारताच्या डॅनी लेशरामला एका चॅलेंजवेळी हाताने जोरदार धक्का दिला. यावर रेफरीनी त्याला लाल कार्ड दाखवित मैदानाबाहेर घालविले. यामुळे उर्वरित वेळेत नेपाळला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले.

दुसऱया सत्रात या गोष्टीचा लाभ उठवत भारताने 63 व्या मिनिटाला ही आघाडी 3-0 अशी केली. गाईटने डाव्या बगलेतून मारलेला क्रॉस फटका गोलबारच्या टॉप कॉर्नरला लागून आत गेला. या सत्रात नेपाळने बदली खेळाडू म्हणून उतरवलेल्या धन सिंगने अखेरच्या काही मिनिटांत दोन संधी निर्माण केल्या. पण भारताने त्याला थोपवण्यात यश मिळविल्याने या संधी वाया गेल्या. एक खेळाडू कमी असण्याचा फटकाही त्यांना बसला. या सत्रात बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या भारताच्या अमनने इंज्युरी टाईममध्ये (94 वे मिनिट) संघाचा चौथा गोल नोंदवत नेपाळच्या जखमेवर आणखी मीठ चोळले आणि याच गोलफरकाने विजय मिळवित भारताने जेतेपद स्वतःकडेच राखण्यात यश  मिळविले.

भारतीय कर्णधार वनलालपेका गाईटला स्पर्धेतील मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार मिळाला तर गोलरक्षक साहिलने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळविला.  भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडेस यांनी संघाचे कौतुक केले. ‘मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. सपोर्ट स्टाफ व खेळाडूंनी परिश्रम घेतले असून या यशाचे ते समान भागीदार आहेत. एआयएफएफने युवा स्तरावर खूप मोलाची मदत केली असून साईच्या मदतीने त्यांनी विविध दौऱयांचे आयोजन करून या मुलांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे,’ असे ते म्हणाले.

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा विजय

Patil_p

चोप्रा, हिमा दास तुर्की दौऱयासाठी सज्ज

Patil_p

भारताचा स्वप्नभंग, बेल्जियम अंतिम फेरीत

Patil_p

ब्राझीलही उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

Patil_p

हैदराबाद संघाला प्लेऑफ पात्रतेसाठी मुंबईविरुद्ध विजयाची गरज

Patil_p

तीन महिन्यानंतर आनंद कुटुंबियांसमवेत

Patil_p