वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई ट्रक सायकलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱया दिवसाअखेर भारताने एकूण 20 पदकांची कमाई केली. या स्पर्धेच्या तिसऱया दिवशी भारताने आणखी दोन कांस्यपदके मिळविली.
पुरूषांच्या 1 कि.मी. टाईम ट्रायल प्रकारात भारताचा सायकलपटू रोनाल्डो सिंगने कांस्यपदक पटकाविले. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेतील रोनाल्डो सिंगचे हे पहिले पदक आहे. या क्रीडा प्रकारात विश्व कनिष्ठ गटातील चॅम्पियन आणि आशियाई स्पर्धेतील विक्रमवीर रोनाल्डो सिंगने 58.254 कि.मी. वेग राखत 1 मिनीट, 01.798 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात जपानच्या ओबेराने सुवर्णपदक तर मलेशियाच्या मोहम्मद फदहिलने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत पुरूषांच्या कनिष्ठ विभागातील 10 कि.मी. पल्ल्याच्या शर्यतीमध्ये भारताच्या बिरजीत युमनामने तिसऱया स्थानासह कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या कीमने सुवर्ण तर मलेशियाच्या येमानने रौप्यपदक पटकाविले. पुरूषांच्या इलाईट गटामध्ये जपानच्या इमामुराने सुवर्णपदक पटकाविले.