सामनावीर जडेजा-केएल राहुल यांची शतकी भागीदारी ठरली
वृत्तसंस्था/ मुंबई
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी केलेली भेदक गोलंदाजी आणि 3 बाद 16 अशा नाजूक स्थितीनंतर केएल राहुल व रवींद्र जडेजा यांनी केलेल्या अभेद्य शतकी भागीदारीमुळे भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. 2 बळी व नाबाद 45 धावा करणाऱया व राहुलला मोलाची साथ दिलेल्या जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी 19 रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 35.4 षटकांत 188 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने एकाकी झुंज देत 81 धावांचे योगदान दिले तर शमी-सिराज यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची स्थिती 3 बाद 16 व नंतर 4 बाद 39 अशी झाली होती. केएल राहुलने प्रथम कर्णधार हार्दिक पंडय़ासमवेत पाचव्या गडय़ासाठी 44 धावांची भागीदारी केली. नंतर जडेजासमवेत संयमी खेळ करीत 108 धावांची अभेद्य शतकी भागीदारी नोंदवत भारताचा विजय 40 व्या षटकात साकार केला. भारताने 39.5 षटकांत 5 बाद 191 धावा जमविल्या. वेगवान गोलंदाजीस मदत करणाऱया या खेळपट्टीवर स्टार्कने 49 धावांत 3 व स्टोईनिसने 27 धावांत 2 बळी मिळविले. ऑस्ट्रेलियन स्पिनर्सना एकही बळी मिळविता आला नाही.


फॉर्मसाठी झगडणाऱया केएल राहुलने परिस्थितीचा अंदाज घेत 91 चेंडूत नाबाद 75 धावा जमविल्या. या खेळीत त्याने 7 चौकार, 1 षटकार मारला. जडेजाने एक बाजू सांभाळत त्याला उत्तम साथ दिली आणि 69 चेंडूत नाबाद 45 धावा जमविल्या. त्यात 5 चौकारांचा समावेश आहे. याशिवाय हार्दिक पंडय़ाने 31 चेंडूत 25 धावा जमविताना 3 चौकार, 1 षटकार मारला.
चांगली सुरुवात होऊनही कांगारूंचा डाव गडगडला
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाने 13 व्या षटकात 1 बाद 77 धावा जमविल्या होत्या. तेव्हा ते मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते. पण हार्दिकची शमीला दुसऱया स्पेलसाठी लगेचच आणण्याची चाल यशस्वी ठरली. त्यांचा डाव अनपेक्षिपतपणे गडगडला आणि त्यांचे शेवटचे 6 गडी 7.5 षटकांत केवळ 59 धावांची भर घालून बाद झाले. शमीने ग्रीनला त्रिफळाचीत केले तो चेंडू बघण्यासारखा होता. ऑफस्टंपच्या रेषेत टाकलेला त्याचा चेंडू ग्रीनने मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अखेरच्या क्षणी किंचित मूव्ह झाल्याने चेंडू ऑफस्टंपवर जाऊन आदळला.
मिचेल मार्शने एकाकी लढत देत 65 चेंडूत आक्रमक 81 धावांची खेळी केली. पण शमीने भेदक मारा करीत भारताला नियंत्रण मिळवून दिले. त्याने 3 षटकांत 2 निर्धाव टाकत 8 धावांत 3 बळी मिळवित ऑस्ट्रेलियाच्या प्रतिकारातील हवा काढून घेतली. शमीने एकूण 6 षटकांत 17 धावा देत 3 बळी मिळविले. दुसऱया बाजूला दुसऱयाच षटकात हेडचा बळी मिळविणाऱया सिराजने दुसऱया स्पेलमध्ये यश मिळवित आणखी दोन बळी टिपले. त्याने 29 धावांत 3 बळी मिळविले.
मार्शने ऑस्ट्रेलियाला जोरदार सुरुवात करून दिली. वनडेत प्रथमच सलामीला खेळताना त्याने आपल्या खेळीत 10 चौकार, 5 षटकारांची बरसात केली. घोटय़ाला झालेल्या दुखापतीनंतर तीन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय पुनरागमन करताना मार्शने शानदार फलंदाजी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे वाटले. पण भारताने ठरावीक अंतराने बळी मिळवित त्यांच्या धावगतीला लगाम घातला. मार्शने कर्णधार स्मिथसमवेत दुसऱया गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी केली. त्यांच्या डावातील ही मोठी भागीदारी ठरली. हार्दिकच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडताना स्मिथ यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला. त्याने 30 चेंडूत 22 धावा केल्या.
मार्श भारताविरुद्ध दुसऱया व जानेवारी 2016 नंतर पहिल्या वनडे शतकाच्या समीप आला होता. पण फटकेबाजीच्या नादात तो जडेजाकडून बाद झाला. ऑफस्टंपबाहेर जाणाऱया चेंडूला मार्शने ऑफकडे जोरदार फटका लगावला. पण तो थर्डमॅनवर शमीकडून झेलबाद झाला. नंतर कुलदीपच्या गोलंदाजीवर जडेजाने एकहाती चकित करणारा झेल टिपत लाबुशेनची खेळी संपुष्टात आणली. नंतर इंग्लिसने शमीचा चेंडू यष्टय़ांवर ओढवून घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची स्थिती 28 व्या षटकांत 5 बाद 169 अशी झाली. 30 व्या षटकात शमीच्या एका अप्रतिम चेंडूवर ग्रीनचा त्रिफळा उडाला. 19 चेंडूत त्याने 12 धावा केल्या. नंतर स्टोईनिस 5 धावांवर बाद झाल्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि 2 बाद 129 वरून सर्व बाद 188 धावांवर त्यांचा डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाजीपेक्षा स्पिन गोलदांजी खेळणे सोपे गेले. कुलदीप-जडेजाच्या फिरकीवर त्यांनी 17 षटकांत 94 धावा वसूल केल्या. जडेजाने 2, हार्दिक व कुलदीप यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 35.4 षटकांत सर्व बाद 188 ः हेड 5, मार्श 81 (65 चेंडूत 10 चौकार, 5 षटकार), स्मिथ 22 (30 चेंडूत 4 चौकार), लाबुशेन 15 (22 चेंडूत 1 चौकार), इंग्लिस 26 (27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ग्रीन 12, मॅक्सवेल 8, स्टोइनिस 5, ऍबॉट 0, स्टार्क नाबाद 4, झाम्पा 0, अवांतर 10. गोलंदाजी ः शमी 3-17, सिराज 3-29, जडेजा 2-46, कुलदीप 1-48, हार्दिक 1-29.
भारत 39.5 षटकांत 5 बाद 191 ः इशान किशन 3, शुबमन गिल 20 (31 चेंडूत 3 चौकार), कोहली 4, सूर्यकुमार 0, केएल राहुल नाबाद 75 (91 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा 25 (31 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), जडेजा नाबाद 45 (69 चेंडूत 5 चौकार), अवांतर 19. गोलंदाजी ः स्टार्क 3-49, स्टोईनिस 2-27.