स्टॅटिस्टा अहवालात दावा, अमेरिका-चीनलाही टाकले मागे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नोकरी किंवा रोजगार देण्याच्या बाबतीत भारताचे संरक्षण मंत्रालय जगात आघाडीवर आहे. स्टॅटिस्टा या जर्मन कंपनीने हा दावा केला आहे. स्टॅटिस्टा ही जर्मनीमधील एक खासगी संस्था असून ती जगभरातील विविध समस्यांवर डेटा किंवा आकडेवारी जारी करते. अहवालात भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे जगातील सर्वात मोठे ‘नियोक्ता’ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. या यादीत अमेरिका दुसऱया तर चीन तिसऱया क्रमांकावर आहे.
‘स्टेटिस्टा’च्या अहवालानुसार भारत सरकारने संरक्षण खात्यात 29.2 लाख लोकांना नोकऱया दिल्या आहेत. या नोकऱया तिन्ही सेवांच्या सर्व विभागांमध्ये (वायुसेना, नौदल आणि लष्कर) दिल्या आहेत. भारतानंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानंतर क्रमांक लागतो. अमेरिकेत 29.1 लाख लोकांना संरक्षण विभागात नोकऱया देण्यात आल्या. तर, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) 25 लाख लोकांना नोकऱया दिल्या आहेत.
लष्करी खर्चात भारत तिसऱया क्रमांकावर
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या मते, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2.1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्ससह सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. यामध्ये सर्वाधिक लष्करी खर्चाच्या बाबतीत अमेरिका आघाडीवर आहे. त्यानंतर चीन दुसऱया तर भारत तिसऱया क्रमांकावर आहे. 2021 मध्ये अमेरिकेचा लष्करी खर्च 801 अब्ज डॉलर होता. त्याच वेळी चीनने आपल्या सैन्यासाठी 293 अब्ज डॉलर्स आणि भारताने 76.6 अब्ज डॉलर्स इतका निधी खर्च केला.
वॉलमार्टचे 23 लाख, ऍमेझॉनचे 16 लाख कर्मचारी
अहवालानुसार, अमेरिकन कंपनी वॉलमार्टमध्ये सर्वाधिक कर्मचारी आहेत. वॉलमार्टने 23 लाख लोकांना नोकऱया दिल्या. त्याचवेळी ऍमेझॉनचे 16 लाख कर्मचारी आहेत. ऍमेझॉन हीसुद्धा एक अमेरिकन कंपनी आहे.