वृत्तसंस्था/ ऑक्सन हिल
भारतीय वंशाची विद्यार्थिनी हरिनी लोगनने 2022 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत स्पेल-ऑफ प्रकारात विजेतेपद मिळविले आहे. हरिनीला यापूर्वी स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेतून हटविण्यात आले होते, परंतु त्यानंतर तिला पुन्हा स्पर्धेत सामील करण्यात आले होते. या स्पर्धेत 12 वर्षीय विक्रम राजू अन् हरिनी यांच्यात मुख्य चुरस होती. 90 सेकंदांमध्ये किती शब्दांचा अचूक उच्चार केला जातो हे या स्पर्धेत पाहिले जाते.
टेक्सासच्या सॅन एंटोनियो येथील 14 वर्षीय हरिनी लोगनने या स्पर्धेतील 50 हजार डॉलर्सचे बक्षीस जिंकले आहे. ही बक्षीसाची रक्कम मेरियम-वेबस्टर आणि एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाकडून अतिरिक्त स्वरुपात दिली जाते. तर डेनव्हर येथील 12 वर्षीय विक्रम राजूला दुसऱया क्रमांकाकरता 25 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे. हरिनीने निश्चित वेळेत 26 पैकी 21 शब्दांचा अचूक उच्चार केला. तर विक्रमेने 19 पैकी 15 शब्दांचा अचूक उच्चार केला होता.
हरिनी ही सॅन एंटोनियोच्या मोंटेसरी स्कुलमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. तिला लेखनाचा छंद असल्याने हायस्कुलमध्ये पुस्तक प्रकाशित करण्याचा तिचा विचार आहे.