वृत्तसंस्था/ बेंगळूर
आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेसाठी वीरेंद्र लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ शुक्रवारी जकार्ताला रवाना झाला. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने अनेक नवोदित खेळाडूंची भारतीय संघात निवड केली आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघासाठी बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये सराव शिबीर आयोजित केले होते. ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघातील वीरेंद्र लाक्राकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आशिया चषक हॉकी स्पर्धेतील भारत विद्यमान विजेता आहे. यावेळी भारतीय संघाचा या स्पर्धेत अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जपान, पाकिस्तान, यजमान इंडोनेशिया तर ब गटात मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना येत्या सोमवारी पाकबरोबर आहे. 2017 साली ढाका येथे झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव केला होता.