Tarun Bharat

भारतीय हॉकी संघाचे कॅनडावर 8 गोल

Advertisements

वृत्तसंस्था /बर्मिंगहम

बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात ब गटातील बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने कॅनडाचा 8-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारतीय हॉकी संघाचा या स्पर्धेतील हा तिसरा सामना होता.

या सामन्यात भारतातर्फे हरमनप्रित सिंगने 7 व्या आणि 54 व्या मिनिटाला असे पेनल्टी कॉर्नरवर 2 गोल, आकाशदीप सिंगने 38 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे 2 मैदानी गोल, अमित रोहिदासने 10 व्या मिनिटाला, ललित उपाध्यायने 20 व्या मिनिटाला, गुरुजंतसिंगने 27 व्या मिनिटाला आणि मनदीपसिंगने 58 व्या मिनिटाला गोल नोंदविले. बुधवारच्या सामन्यातील एकतर्फी विजयानंतर भारताने ब गटात इंग्लंडला मागे टाकत आघाडीचे स्थान मिळविले आहे. भारतीय हॉकी संघाचा आता ब गटातील शेवटचा साखळी सामना वेल्सबरोबर खेळविला जात आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाला यजमान इंग्लंडविरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीत सोडवावा लागला होता. या सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत 3-0 अशी आघाडी इंग्लंडवर घेतली होती. पण सामन्याच्या उत्तरार्धात इंग्लंडने 4 गोल नोंदवून भारताला विजयापासून वंचित केले. बुधवारच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपले वर्चस्व ठेवले होते. आक्रमक आणि जलद खेळाच्या जोरावर भारताने पाचव्या आणि सातव्या मिनिटाला असे पाठोपाठ पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पहिला पेनल्टी कॉर्नर वाया गेला. पण त्यानंतर हरमनप्रितसिंगने सातव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. अमित रोहिदासने दहाव्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. ललित उपाध्यायने 20 व्या मिनिटाला तर गुरुजंतसिंगने 27 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून भारताला मध्यंतरापर्यंत 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.

भारतीय हॉकी संघाने सामन्याच्या उत्तरार्धात आणखी 4 गोल नोंदविले. आकाशदीपने 38 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. 54 व्या मिनिटाला हरमनप्रिंतसिंगने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पाचवा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. 58 व्या मिनिटाला मनदीपसिंगने मैदानी गोल नोंदवून भारताची आघाडी वाढविली. सामना संपण्यास केवळ काही सेकंद बाकी असताना आकाशदीप सिंगने भारताचा आठवा आणि शेवटचा गोल नेंदवून कॅनडाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात कॅनडाला काही पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण त्याचा लाभ उठवता आला नाही. भारताचे गोलरक्षक आणि बचावफळीतील कामगिरी भक्कम झाल्याने कॅनडा शेवटपर्यंत आपले खाते उघडण्यात अपयशी ठरला.

Related Stories

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

datta jadhav

अष्टपैलू ख्रिस केर्न्सला कर्करोग

Patil_p

आरसीबीच्या पदरी अपयशाचा ‘वनवास’!

Patil_p

भारतीय तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये 187 देशांचा सहभाग

Patil_p

कुस्ती माझा ध्यास अन् कुस्ती हाच श्वास : कुस्ती समालोचक शंकर पुजारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!