वृत्तसंस्था/ राऊरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या हॉकी प्रो लिग स्पर्धेतील सोमवारी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान भारताने विद्यमान विश्वचषक विजेत्या जर्मनीला 6-3 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेमध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दोनवेळा जर्मनीचा तर एकदा बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपली जियी घोडदौड कायम राखली आहे. सोमवारच्या सामन्यात भारतातर्फे अभिषेकने 22 व्या आणि 51 व्या मिनिटाला तसेच सेल्वन कार्तीने 24 व्या आणि 46 व्या मिनिटाला, जुगराज सिंगने 21 व्या मिनिटाला आणि कर्णधार हरमनप्रित सिंगने 26 व्या मिनिटाला गोल नोंदवले. जर्मनीतर्फे टॉम ग्रेमबुशने तिसऱ्या मिनिटाला, गोन्झालो पिलेटने 23 व्या तर माल्टे हेलविगने 31 व्या मिनिटाला गोल केले.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात सहाव्या स्थानावर असलेल्या भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विश्वचषक विजेत्या जर्मनीचा 3-2 अशा गोलफरकाने तर त्यानंतर चौथ्या मानांकित ऑस्ट्रेलियाचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. सोमवारच्या सामन्यात टॉम ग्रेमबुशने पेनल्टी कॉर्नरवर तिसऱ्याच मिनिटाला जर्मनीचे खाते उघडले. या सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत जर्मनीने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताला जर्मनीशी बरोबरी करताना फारसे कठीण गेले नाही. जुगराज सिंगने 21 व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला अभिषेकने भारताला आघाडीवर नेताना संघाचा दुसरा गोल केला. 23 व्या मिनिटाला गोन्झालो पिलेटने जर्मनीचा दुसरा गोल केला. 24 व्या मिनिटाला सेल्वन कार्तीने भारताचा तिसरा गोल नोंदवला. कर्णधार हरमनप्रित सिंगने 26 व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला 4-2 अशी आघाडी मध्यंतरावेळी मिळवून दिली.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला म्हणजेच 31 व्या मिनिटाला माल्टे हेलविगने जर्मनीचा तिसरा गोल करून भारताची आघाडी थोडी कमी केली. 46 व्या मिनिटला सेल्वन कार्तीने भारताचा पाचवा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. 51 व्या मिनिटाला अभिषेकने भारताचा सहावा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून जर्मनीचे आव्हान 6-3 असे संपुष्टात आणले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लिग 2022-23 च्या हंगामात भारतीय हॉकी संघाने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. या हंगामातील यापूर्वीच्या सामन्यात न्यूझीलंडचा 4-3 तसेच दुसऱ्या लढतीत 7-4 असा पराभव केला. पण गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय हॉकी संघाला पहिल्या सामन्यात स्पेनने 3-2 असे पराभूत केले होते. आता भारतीय हॉकी संघाचा या स्पर्धेतील परतीचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर बुधवारी खेळवला जाणार आहे.