वृत्तसंस्था /बेंगळूर
ओमानमधील सलाल येथे 23 मे ते 1 जून दरम्यान होणाऱ्या कनिष्ठांच्या आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय कनिष्ठ पुरुषांच्या हॉकी संघाचे नेतृत्व आगामी फळी खेळणाऱ्या उत्तम सिंगकडे सोपवण्यात आले आहे. गेल्या वर्षी उत्तम सिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धा पुन्हा जिंकली होती. ओमानमधील ही आगामी स्पर्धा म्हणजे मलेशियात येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या कनिष्ठांच्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठीची पात्रतेची स्पर्धा म्हणून राहिल. ओमानमधील या स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश करण्यात आला असून या गटामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, जपान, थायलंड आणि चीन तैपेई तर ब गटात कोरिया, मलेशिया, यजमान ओमान, बांगलादेश आणि उझ्बेकीस्तान यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारताने सडनडेथमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात उत्तर प्रदेशच्या उत्तम सिंगने पेनल्टी शुटआऊटमध्ये 2 गोल नेंदवले होते. या सामन्यात भारताच्या विष्णुकांत सिंग आणि सुदीप चिरमाको यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. ओमानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सुल्तान जोहोर चषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघातील 18 सदस्यांनी आपले संघातील स्थान कायम राखले आहे.
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघ
- गोलरक्षक-एच. एस. मोहित, हिमवान सिहाग,
- बचावफळी- शारदानंद तिवारी, रोहित, अमनदीप लाक्रा, अमीर अली, योगेंबर रावत,
- मध्यफळी- विष्णुकांत सिंग, राजेंदर सिंग, सी. बी. पुवन्ना, अमनदीप, सुनील लाक्रा,
- आघाडीफळी-बॉबी सिंग धामी (उपकर्णधार), अरजित सिंग हुंडाल, आदित्य लालगे, उत्तम सिंग (कर्णधार), सुदीप चिरमाको आणि अंगद बिर सिंग.